मुख्यमंत्र्यांच्या १७च्या सभेपूर्वीच धुळ्यात वातावरण तापले

devendra fadnavis
devendra fadnavis

धुळ्यात १७ ला दौरा : भाजप आमदार गोटे आणि 'राष्ट्रवादी'तील वादाचे पडसाद

धुळे : स्थानिक काही ज्वलंत विषयांवरून भाजपाचे येथील आमदार अनिल गोटे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेससह शिवसेनेत काही दिवसांपासून आरोपांच्या फैरीसह पत्रकयुध्द सुरू आहे. अशात मुख्यमंत्र्यांचा १७ मेस जिल्हा दौरा असल्याने त्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा 'राष्ट्रवादी'ने दिला आहे, तर त्यासाठी याल पायाने; पण जाल कसे? , असा थेट गर्भित इशारा आमदार गोटे यांनी विरोधकांना दिला आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण मुख्यमंत्र्यांचा दौरा होईपर्यंत तापलेले दिसेल.

शिस्त आणि सुसंस्काराचे धडे गिरविणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि याच जोरावर राज्य आणि केंद्रात सत्ता हाती घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारातील अनेक आमदार या ना त्या कारणांनी जनप्रक्षोभाला सामोरे जात आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेले विधान तमाम भाजपवासीयांना क्लेशदायक ठरले असतांना धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांनी चालविलेल्या बेछूट विधानांवर मुख्यमंत्री फडणवीस यांना सारवासारव करावी लागली नाही तरच नवल!

भाजपसाठी संशोधनाचा विषय
अलीकडे येथे आमदार गोटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी राजकीय लढाई सुरू आहे. उभयतांमधील प्रसिध्दीपत्रक युद्धात आमदार गोटे हे ज्या पद्धतीने बेछूट विधाने करीत आहेत, ते त्यांच्या स्वपक्षातील किती जणांना सुखावह वाटतात, हा संशोधनाचा विषय ठरावा.

कामे तपासण्याची गरज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ गोटे आमदार आहेत म्हणूनच नव्हे तर तमाम धुळेकरांसाठी काहीतरी नवे निर्माण व्हावे, या उदात्त हेतूने नगरविकास खात्यामार्फत तब्बल ७५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची तयारी ठेवली. ही घसघशीत मदत नक्कीच अभिनंदन आणि आभारला पात्र आहे. पण आमदार गोटे यांनी ज्या कामासाठी ही मदत घेतली,  ती कामे आपल्या राजकीय, प्रशासकीय किंवा पक्षीय धोरणात बसतात का? हे तपासण्याची गरज निर्माण झाल्याचे मानले जाते. कारण अशा कामांच्या भूमीपूजन, शुभारंभ किंवा उद्घाटनाच्या "कार्यक्रमाचा शो" भलेही दैदिप्यमान होईलही, पण त्याचे पडसाद मात्र पक्षीय पातळीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण आमदार गोटे यांना स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने का टार्गेट केले, या बहुचर्चीत लढ्यात सापडते आणि हेच धुळ्यात येण्याआधी मुख्यमंत्र्यांनी तपासून पहायला हवे, असे काही अधिकारीही खासगीत बोलतात.

गैरकामांना मुख्यमंत्र्यांचे अभय?
आमदार गोटे यांनी यापूर्वी काही केलेली आणि अलीकडे हाती घेतलेली अनेक कामे बेकायदेशीर असल्याने ती प्रशासकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहेत. अशावेळी अशाच एखाद्या वादग्रस्त विकास कामांचे उद्घाटन किंवा शुभारंभ, भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री येत असतील तर मग आमदार गोटे यांच्या बेकायदेशीर कृत्याला थेट मुख्यमंत्र्यांकडूनच अभय असल्याचे आपोआपच अधोरेखीत होणार आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम उत्साही मंडळींकडून केवळ विरोधकांच्या जिद्दीवर रेटून नेण्याचा प्रयत्न झालाच तर तो मुख्यमंत्री व त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेलाही जबर तडा देणारा ठरु शकेल.

तर मुख्यमंत्र्यांच्याही प्रतिमेला तडा
आमदार गोटे यांनी राजकीय पटलावर आणि सामाजिक स्तरावरही अंगिकारलेली भाषा आणि संवादाचे मुद्दे अतिशय हीन दर्जाचे मानले गेले आहेत. "राजकारणात कुणी कायम मित्र नसतो, तसा कायमस्वरूपी शत्रूही नसतो" हे प्रचलित गृहीतक ठाऊक असूनही आमदार गोटे यांनी मुद्यांना धरून न बोलता विरोधकांच्या कौटुंबिक पातळीवर घसरत अनेकांच्या अब्रूची धिंडवडे काढून मनस्वी समाधान मिळविले. पण आपण ज्या 'आरएसएस'चे नाव घेऊन राजकारण आणि समाजकारण करण्याचे वातावरण तयार करीत आहोत, हे त्या पक्ष आणि संघटना, संस्थेला हे कृत्य शोभून आहे का? याचाही विचार आमदार गोटे यांनी केलेला नाही. यामुळे सहाजिकच १७ मेस मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य सभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडाडून विरोध होऊ शकेल. केवळ आमदार गोटे यांना खुश करण्यासाठी भलेही मुख्यमंत्र्यांनी येथे कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले असेल पण त्यांच्या प्रतिमेला तडा जाण्याचीच शक्यता अधिक राहणार आहे.

कारण कोट्यवधींची शासकीय आरक्षित जागा बळकावत आमदार गोटे यांनी अनेक ठिकाणी अनधिकृत कामे हाती घेतली. विशेष म्हणजे युती सरकारने उच्च न्यायालयाच्या धाकाने यापैकी काही कामे अनधिकृत, अतिक्रमीत ठरविली आहेत. या अनुषंगाने सुरू होणाऱ्या न्यायिक  कारवाईला महसूल मंत्र्यांनी तोंडी आदेशाने स्थगिती दिली. हा आदेश म्हणजे उच्च न्यायालयाचा अनादर मानला जातो आहे. अशा कामांसह पांझरा नदी पात्रातील बेकायदेशीर व कुठलीही 'एनआेसी' (ना हरकत प्रमाणपत्र) नसताना झालेली व नियोजीत कामे शुभारंभ आणि बहुचर्चीत उदघाटनाच्या कार्यक्रमांचे नियोजन बनली आहेत. खरे तर मुख्यमंत्र्यांनीही कुठलिही खातरजमा न करता आणि विविध खात्यांची 'एनआेसी' न तपासता पांझरा नदी पात्रात दुतर्फा साडेपाच किलोमीतर अंतराच्या रस्त्यांसाठी थेट ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळेच या विषयाला न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले. कारण ही प्रक्रिया प्रचलित नियमांना धरून नाही. तरीही मुख्यमंत्री दौरा होणार असेल तर या कार्यक्रमाचे राजकीय भांडवल आमदार गोटेंना नव्हे तर भाजपा आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्याच प्रतिमेला तडा देणारे ठरू शकेल, असे राजकीय वर्तुळात म्हटले जातेय.

शिवसेनेचेही प्रश्नार्थक पत्र
दरम्यान, 'राष्ट्रवादी'ने मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याची निर्णय जाहीर केला आहे, तर बेकायदेशीर कामांचे उद्घाटन व भूमीपूजन करणे मुख्यमंत्र्यांच्या 'प्रोटोकाॅल'मध्ये बसते का? असा सवाल करणारे पत्र शिवसेनेतील गोटे विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. यामुळे हा कलगीतुरा कुणाच्या पथ्यावर पडतो हे भविष्यात स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com