व्हॉट्‌सऍपद्वारे हरविलेल्या मुलांचा शोध

विजय निरभवणे
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

देवळालीगाव - घरात कुणासही निरोप न देता 20 वर्षांचा तरुण बेपत्ता होतो. आई- वडील मुलाचा शोध घेतात. पोलिसात तक्रार देतात.

देवळालीगाव - घरात कुणासही निरोप न देता 20 वर्षांचा तरुण बेपत्ता होतो. आई- वडील मुलाचा शोध घेतात. पोलिसात तक्रार देतात.

छत्तीसगडहून नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांना फोन येतो अन्‌ सुरू होतो तपास. लोहमार्ग पोलिस सोशल मीडियाचा वापर करीत रेल्वेस्थानक परिसर पिंजून काढतात. अखेर नाशिकरोड रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ मुलगा दिसतो. सोशल मीडियावरून त्याची ओळख पोलिस पटवतात. त्याला विश्‍वासात घेऊन दोन दिवस सांभाळतात अन्‌ आई-वडिलांचा स्वाधीन करतात.

सोशल मीडियाचा वापर करीत हरविलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम केले आहे, ते नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी. छत्तीसगड येथील रहिवाशी असलेले गंगाप्रसाद सिन्हा यांचा मुलगा स्वप्नील गंगाप्रसाद सिन्हा (वय 20) हा बुधवारी (ता. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता मोटारसायकलसह घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने धमतरी पोलिस ठाण्यात वडिलांनी हरविल्याची तक्रार दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्‍वेता मिश्रा यांनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 23) स्वप्नीलच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचे लोकेशन शोधले. ते स्थळ नाशिकरोड रेल्वेस्थानक असल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब नाशिकरोड लोहमार्ग पोलिस ठाण्यात संपर्क साधला. कामावरील हवालदार संजय केदारे यांना हरविलेल्या मुलाच्या संदर्भातील माहिती पाठवून तो नाशिकरोड रेल्वेस्थानकातील हद्दीत असल्याची माहिती दिली.

सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांनी हरविलेल्या मुलाचा मोबाईल क्रमांक, मुलाच्या छायाचित्रासह माहिती पोलिसांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पाठविली. सहायक पोलिस उपनिरिक्षक मांगीलाल पारधी यांच्यासह संपूर्ण रेल्वेस्थानक परिसर पिंजून काढला. यात नाशिकरोड रेल्वेस्थानकातील मुख्य तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ स्वप्नील सापडला. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले.
लोहमार्ग पोलिस स्थानकातील प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी पाटील यांनी मुलाची चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलिसांनी प्रथम छत्तीसगडच्या पोलिसांशी संपर्क साधून मुलासंदर्भात माहिती दिली. आज दुपारी मुलाचे आई- वडील त्याला घेण्यासाठी आले. त्या वेळी मुलाचा शोध घेणाऱ्या पोलिसांचे तोंड गोड करून त्यांनी आभार मानले.

गेल्या आठवड्यात जबलपूर येथील घरातून रागाने पळालेल्या वैभवला शोधण्यात रेल्वे सुरक्षा दलाने असाच व्हॉट्‌सऍपचा वापर केला होता. गुरुवारी (ता. 23) लोहमार्ग पोलिसांनी व्हॉटसऍप ग्रुपवरून छत्तीसगडचा स्वप्नीलचा शोध घेतला. त्यामुळे सध्या नाशिकरोड रेल्वेस्थानकातील व्हॉट्‌सऍप ग्रुपवरील पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.

Web Title: devlaligaon nashik news missing boy searching by whatsapp