धनगर समाजाचा बागलाण तहसीलवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सत्ता मिळताच धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर चार वर्षे उलटली तरीही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावता विश्वासघात केला आहे, असा आरोप करीत राज्यातील धनगर समाजाला त्वरीत अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज सोमवार (ता.13) रोजी सटाणा शहर व बागलाण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष करीत बागलाण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

सटाणा : सत्ता मिळताच धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर चार वर्षे उलटली तरीही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावता विश्वासघात केला आहे, असा आरोप करीत राज्यातील धनगर समाजाला त्वरीत अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज सोमवार (ता.13) रोजी सटाणा शहर व बागलाण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष करीत बागलाण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात अग्रभागी असलेला मेंढयांचा कळप, पिवळा फेटा व धोतर परिधान करीत खांद्यावर घोंगडी व हातात काठी घेवून सहभागी झालेल्या धनगर समाजबांधवांनी प्रशासनासह शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.

शासनाने धनगर समाजाला तत्काळ आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी आज या मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी 10 वाजता शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने पुरुष, महिला, युवक व युवती समाजबांधव एकत्रित आले. अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टिळक रोडमार्गे विंचूर प्रकाशा राज्य महामार्गावरून तहसील कार्यलयावर मोर्चा धडकला. यावेळी पोलीस कवायत मैदानावर ठिय्या देत आंदोलकांनी शासनविरोधी घोषणाबाजी करीत 'आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा घोषणाही दिल्या.  

यावेळी, प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने येत्या पंधरा दिवसात धनगर आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र बिरारी, मुख्याध्यापक अनिल जाधव, निलेश पाकळे, नगरसेवक दीपक पाकळे, भारत काटके, दीपक नंदाळे, आप्पा नंदाळे, यशवंत नंदाळे, रुपेश नंदाळे, अनिल पाकळे, वैभव नंदाळे, विनोद नंदाळे, प्रशांत नंदाळे, दिनकर पाकळे, आदेश नंदाळे, मधुकर नंदाळे, स्वप्नील नंदाळे, रावसाहेब ठोंबरे, रतन गायकर, सजन सूळ, भरत शिरोळे, समाधान नंदाळे, मधुकर मोरे, मधुकर नंदाळे, अनिल कांदळकर, साहेबराव कांदळकर, योगेश सूळ, धीरज पगारे, ज्ञानेश्वर नंदाळे, दिनकर नंदाळे, प्रशांत नंदाळे, संभाजी मोरे, रुपेश साबळे, शाम पवार, नंदू पवार, सुनील पाकळे, अमोल पाकळे, विनोद नंदाळे, आदेश नंदाळे, स्वप्नील नादळे, परशराम पाकळे, भाऊसाहेब कांदळकर  आदींसह हजारो धनगर समाज बांधव मोर्चेत सहभागी होते.

या आहेत प्रमुख मागण्या
बागलाण तालुक्यात धनगर समाजाची एकूण लोकसंख्या जाहीर करावी, राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची अंमलबजावणी करावी, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, शहीद परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबियांना 25 लाख रूपयांची आर्थिक मदत द्यावी, धनगर आरक्षण आंदोलनातील समाजबांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, धनगर समाजातील मेंढपाळांना त्रास देणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, मेंढपाळांना शासकीय मदत घेऊन मेंढ्यासाठी मोफत लसीकरण व मेंढपाळाच्या परिवारासाठी विमायोजना सुरु करावी.

Web Title: Dhangar community movement on Baglan Tehshil