चिपलीपाड्यात ‘धर्मपूर्व आदिम लगीन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

निजामपूर -चिपलीपाडा (ता. साक्री) येथे नुकताच पारंपरिक आदिवासी पद्धतीने ‘धर्मपूर्व आदिम लगीन सोहळा’ झाला. अशा पद्धतीचा हा पहिलाच विवाह असल्याचा दावा झाला. यावेळी हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

निजामपूर -चिपलीपाडा (ता. साक्री) येथे नुकताच पारंपरिक आदिवासी पद्धतीने ‘धर्मपूर्व आदिम लगीन सोहळा’ झाला. अशा पद्धतीचा हा पहिलाच विवाह असल्याचा दावा झाला. यावेळी हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

येथील आप. मुंगीलाल अंबर गांगुर्डे यांचे पुत्र, आदिवासी बचाव अभियानाचे साक्री तालुकाप्रमुख आप. मांगीलाल गांगुर्डे यांचे पुतणे जीवलाल व आप. चुनीलाल ओंकार बागूल (रा. रायकोट, ता. साक्री) यांची कन्या सुनीता यांचा विवाह आदिवासी संस्कृती, देव-देवता, आदिवासी क्रांतिवीर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून धान, निसर्गपूजन, आदिवासी मांडव मंत्र गाऊन सर्वांच्या साक्षीने झाला. परिसरातील आप्तजणांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो समाजबांधव आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. 

लग्नसोहळ्यातील ठळक वैशिष्ट्ये...
मांडव मंत्र रचनाकार आप. कवी रमेश भोये यांनी धर्मपूर्व आदिम लगीन पद्धतीची उपस्थित पाहुण्यांना माहिती दिली. अक्षता म्हणजेच धान का नको, कन्यादान ही संकल्पना, मंगलाष्टकांऐवजी मांडवमंत्र का, यासह आपल्या संस्कृतीचे होणारे विडंबन यावर प्रकाशझोत टाकला. वधू-वर मांडवात आल्याबरोबर उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. आदिवासी पारंपरिक वाद्ये मंडपात आल्यानंतर मंचासमोर वधू-वरांच्या हस्ते धानपूजन, निसर्गपूजन व आदिवासी क्रांतिवीरांना पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या. मंचावरील अनावश्‍यक गर्दी कमी करण्यात आली. वधू-वरांचे आई, वडील, मामा, कलोरी, पंच, मांडवमंत्र गायक आप. राजाराम चौरे यांनाच मंचावर स्थान होते. 

मंचावर सर्व उपस्थित झाल्यानंतर ‘लग्न लावायचं का मंडळी?’ अशी सूचना करून परवानगी घेण्यात आली. राजाराम चौरे यांच्या सुमधुर आवाजातील मांडव मंत्र गायनावेळी उपस्थितांमध्ये प्रचंड शांतता होती. पुष्पांजली म्हणताक्षणी झेंडू फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव वधू-वरांवर झाला. वधू सुजाताने ‘फडकी’ ओढणी म्हणून अंगावर घेतली होती. चिपलीपाडा परिसरातील आदिवासी पद्धतीने हा पहिलाच विवाह सोहळा असल्याने युवक हरखून गेले होते. आम्हीही याच पद्धतीने विवाह करणार, आम्हाला फक्त मार्गदर्शन करा, अशी मागणी केली.

Web Title: Dharmpurv aadim lagin