नशेखोरांकडून क्रूर कृत्य; धुळे पुरते बदनाम!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

धुळे - हिंसक जमावाकडून राईनपाड्यात (ता. साक्री) रविवारी निरपराध पाच जणांचे अमानुष, क्रौर्याची परिसीमा ओलांडणारे हत्याकांड झाले. शहरासह जिल्ह्यामध्ये सातत्याने क्रूरतेचा प्रत्यय देणाऱ्या अनुचित घटना घडत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे. त्यात राईनपाड्याच्या घटनेची भर पडल्याने देशपातळीवर जिल्ह्याला पुन्हा बदनामीचा कलंक लागला. यात हिंसक जमावातील ६० ते ७० टक्के मद्यपी असलेल्यांनी क्रूर कृत्य केल्याने समाजाने अवैध व्यवसाय, बनावट दारूप्रश्‍नी पोलिस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

धुळे - हिंसक जमावाकडून राईनपाड्यात (ता. साक्री) रविवारी निरपराध पाच जणांचे अमानुष, क्रौर्याची परिसीमा ओलांडणारे हत्याकांड झाले. शहरासह जिल्ह्यामध्ये सातत्याने क्रूरतेचा प्रत्यय देणाऱ्या अनुचित घटना घडत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे. त्यात राईनपाड्याच्या घटनेची भर पडल्याने देशपातळीवर जिल्ह्याला पुन्हा बदनामीचा कलंक लागला. यात हिंसक जमावातील ६० ते ७० टक्के मद्यपी असलेल्यांनी क्रूर कृत्य केल्याने समाजाने अवैध व्यवसाय, बनावट दारूप्रश्‍नी पोलिस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अवैध व्यवसायांचा विळखा
आदिवासी भागाला अवैध व्यवसायांनी विळखा घातला आहे. शहरात वाढते अवैध व्यवसाय, गुंडगिरी, सामाजिक दबाव वाढत असल्याने अवैध व्यावसायिकांनी ग्रामीण भागात, आदिवासीबहुल क्षेत्रात पाय पसरविले आहेत. यातून आदिवासी संस्कृतीवर घाला घातला जात आहे. यात सट्टा, मटका, जुगारापर्यंतच अवैध व्यवसाय सीमित नाही, तर बनावट दारूचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. बनावट दारूचे कारखाने आणि सर्रास विक्रीच्या घटना वेगवेगळ्या कारवायांतून उजेडात येत असताना त्या थांबण्याचे नावच घेत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. 

खाबुगिरीने जिल्हा पोखरला
अनेक महाभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील खाबुगिरीच्या संस्कृतीने जिल्हा पोखरल्याचे सर्वश्रुत आहे. हप्तेखोरीतून रग्गड कमाई, अनेक वाटेकऱ्यांची तोंडे गप्प करून बिनबोभाटपणे अवैध व्यवसायांना दिले जाणारे पाठबळ, अवैध व्यावसायिकांशी सलगी, किंबहुना त्यांच्या व्यवसायात भागीदारी, परिणामी वाढती गुंडगिरी शहरासह जिल्ह्याच्या कायदा- सुव्यवस्थेच्या मुळाशी उठल्याची भावना धुळेकरांमध्ये निर्माण झाली आहे. असे काही प्रकार वेळोवेळी पोलिसांच्या दप्तरी गुन्ह्याच्या स्वरूपातही नोंदले गेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये वेळोवेळी लाच प्रकरणी झालेल्या कारवाया ही यंत्रणा खाबुगिरीने पोखरल्याची पुष्टी देणाऱ्याच ठरल्या आहेत. यावरून बोध घेण्याऐवजी स्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. या संदर्भात सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून असल्याने उलटसुलट चर्चा होते.     

बनावट दारूचा गंभीर प्रश्‍न      
बनावट दारूचा प्रश्‍न तर दिवसागणिक गंभीर होत आहे. त्याचे मुख्य केंद्र शिरपूर तालुका ठरले. नंतर हा व्यवसाय धुळे, शिंदखेडा, साक्री तालुक्‍यांतही विस्तारला. त्यात शिरूडला (ता. धुळे) एका हवालदाराचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिस डोळसपणाने हा प्रश्‍न हाताळतील, अशी धुळेकरांना अपेक्षा होती, ती फोल ठरली. काही मद्य तस्करांना पकडले तरी ते पोलिसांच्या गळाला लागू शकलेले नाहीत, हे धगधगते वास्तव आहे.

मद्यतस्कर दादा वाणी हा नगरच्या कारवाईत गजाआड झाला. तत्पूर्वी, त्याच्यावर जिल्हा यंत्रणेकडून केली जाणारी ‘एमपीडीए’ची कारवाई त्याने रद्द करून आणली होती. इतकेच नाही तर अनेक गुन्ह्यांतील आरोपी, गुंड हे हद्दपारीची कारवाई वेळोवेळी स्थगित किंवा रद्द करून आणत असल्याने धुळेकर धास्तावले आहेत. पोलिसांचा अंकुश, कुठलाही धाकच उरला नसल्याने नशेखोर, गुंडांकडून क्रौर्याची परिसीमा गाठली जात असल्याचा निष्कर्ष विविध पातळींवरून काढला जात आहे.    

आदिवासी भागात प्रखर चिंता
आदिवासी भागात अनेक दुकाने, टपऱ्यांमध्ये सर्रास बनावट, गावठी दारू, पेट्रोल, डिझेलची विक्री होते. चाळीस रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत भरपेट दारू उपलब्ध होते. त्यामुळे असंख्य आदिवासी तरुण, प्रौढ व्यसनाधीन झाले आहेत. परिणामी, महिलांची छेडखानी, हाणामाऱ्या, अपघातांचे प्रमाण वाढते आहे. राईनपाड्यातील हिंसक जमावामधील मद्यपींकडून झालेले हत्याकांड हे याचेच द्योतक मानले जात आहे. मात्र, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. ही स्थिती युती सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होते. यात शहरासह जिल्ह्याचा सामाजिक स्तर घसरत चालला असताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

सोशल मीडियामुळे जिल्ह्याला कलंक
सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट, क्‍लिप व्हायरल होत असल्याने शहरासह जिल्ह्याचे वातावरण गढूळ होते आहे. शहरात १८ जुलैला झालेले गुड्ड्याचे हत्याकांड, २८ सप्टेंबरला सागर धोंडिराम पगारेचा खून, १९ ऑक्‍टोबरला दिनेश प्रल्हाद चौधरीची हत्या, १८ एप्रिलला सनी साळवेची हत्या, ८ जूनला रावसाहेब पाटील, वैभव पाटील या पिता-पुत्राची हत्या आणि आता राईनपाड्यातील पाच जणांचे हत्याकांड क्रौर्याची परिसीमा गाठणारे ठरले. या घटनांसंबंधी अनेक ‘क्‍लिप’, छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे देश- विदेशात व्हायरल झाल्याने शहरासह जिल्ह्याला बदनामीचा कलंक लागला आहे. तो कर्तव्यकठोर, प्रामाणिक अधिकारी आणि कर्तबगार लोकप्रतिनिधीच पुसू शकतील, असे मत असंख्य धुळेकर व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: dhule aamli rainpada hatyakand police alcoholic people crime