खवे, मानेवाडी, हुन्नूरवर पसरली शोककळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

आमचा भिक्षेकरी समाज असून उपजीविकेसाठी देशात फिरत असतो. आता आमच्यासारख्या भिक्षेकऱ्याला चोर समजून थेट मारून टाकू लागले तर जगायचे कसे? सरकारने या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करून भिक्षेकरी समाजास संरक्षण द्यावे.
- गोरखनाथ भोसले, हुन्नूर

मंगळवेढा /भोसे - उपजीविकेसाठी पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) परिसरात आलेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील चार आणि कर्नाटकातील एकाची हत्या झाल्याचे कळताच खवे,  मानेवाडी- हुन्नूर परिसरावर शोककळा पसरली आहे. हे सगळे नाथपंथी डवरी समाजातील असून, भिक्षा मागून ते उपजीविका करतात.

राईनपाड्यातील लोकांनी निर्दय मारहाण केल्यामुळे मृतांची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले होते. एकाच्या आधार कार्डवरील पत्त्यामुळे त्यांचा शोध लागला. 

दुष्काळी गाव असलेल्या खवे येथील नाथपंथी डवरी समाजाचे लोक उपजीविकेसाठी वर्षभर महाराष्ट्रभर भिक्षा मागण्यासाठी फिरतात. त्यांना मुले पळविणारी टोळी समजून त्यांच्यावर हल्ला करून ठार मारल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी या लोकांकडे स्थायी स्वरूपाचा कोणताही आधार नाही. त्यामुळे भिक्षा मागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

मृतांमध्ये भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे हे तीन खवेचे, तर अप्पा श्रीमंत इंगोले हे मानेवाडीचे आहेत. राजू भोसले (रा. गोंदवन ता. इंडी, जि. विजयपूर) येथील आहे. घटना कळताच मृतांचे नातेवाईक व महिलांनी एकच हंबरडा फोडला.

उपजीविकेसाठी भटकंती
वडिलांचे छत्र हरपल्याने आपल्या आई व बहिणींना आधार देण्यासाठी अप्पा हा खवे येथील नातेवाइकांबरोबर उपजीविकेसाठी चार महिन्यांपूर्वी मानेवाडी येथून गेला होता. आपल्या नातेवाइकांसोबत तो धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात भटकंती करत होता. त्याची व इतरांची कसलीही चूक नसताना त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेने नाथपंथी डवरी गोसावी समाजातून संताप व्यक्त होत आहे. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी निघणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.

आमचा भिक्षेकरी समाज असून उपजीविकेसाठी देशात फिरत असतो. आता आमच्यासारख्या भिक्षेकऱ्याला चोर समजून थेट मारून टाकू लागले तर जगायचे कसे? सरकारने या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करून भिक्षेकरी समाजास संरक्षण द्यावे.
- गोरखनाथ भोसले, हुन्नूर

 ‘सकाळ’ मुळे  समजली घटना
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दादाराव भोसले यांच्या आधार कार्डवर खवले (ता. मंगळवेढा) असा पत्ता होता. या गावाचा तालुक्‍यात बोध होत नव्हता. ‘सकाळ’च्या बातमीदाराने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हे नाव टाकले असता खवे येथे या नावाची व्यक्ती आढळून आली. प्रत्यक्ष गावात गेल्यानंतर या घटनेबाबत गावकऱ्यांनी काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. गावातील तरुण जमा झाल्यावर त्यांना ‘ई सकाळ’वरील बातमी दाखवली. त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली. गावातील नातेवाईक व ग्रामस्थ भोसले यांच्याकडे घराकडे गोळा होऊ लागले अन्‌ घटनेची उकल होत गेली.

Web Title: dhule bhikshekari murder case child theft case