भाजप आमदारांच्या निषेधार्थ धुळे "बंद' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

धुळे : शहरात पांझरा नदीकाठी रस्ते विस्तारीकरणांतर्गत मंदिरे पाडण्याची कारवाई सुरू आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या दबावामुळे ही कारवाई होत आहे. अशा धर्मविरोधी कृतीच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यासह विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी आज (ता.16) पुकारलेल्या धुळे "बंद'ला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा आंदोलकांनी केला.  

देवपूरमधील दत्तमंदिर, मुख्य बाजारपेठ असलेला आग्रा रोड, पेठ भागासह शहरात ठिकठिकाणी अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद, तर व्यवहार ठप्प दिसून आले. रिक्षा वाहतूकही बंद होती. काही भागात तुरळक प्रमाणात व्यवहार सुरू होते. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. महिन्यापासून मंदिरांवरील कारवाईप्रश्‍नी उद्‌भवलेल्या राजकीय वादात शहर वेठीस धरले गेले आहे. त्यामुळे संवेदनशील स्थिती निर्माण झाली आहे. 

"बंद'चे आवाहन करणारे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, भाजपचे शहराध्यक्ष हिरामण गवळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे, संजय वाल्हे, अरुण पवार, मनोज जाधव आदींना पोलिसांनी अटक केली. शहरात शांततेत बंद पाळण्यात येत आहे. सोशल मीडियावर गोटे समर्थक आणि विरोधकांमध्ये "बंद'विषयी प्रतिसादावरून दावे- प्रतिदाव्यांचे युद्ध रंगले आहे. 

शहरातील नागरिक वा कुणाचाही विकास कामांना विरोध नाही. आमदार गोटे यांनी हाती घेतलेल्या पांझरा नदीकाठच्या रस्ते विस्तारीकरणाचे काम होऊ शकते. मात्र, सरळ मार्गाने ते विकास कामे करीत नाहीत. प्रत्येक कामात स्वतःहून विरोध तयार करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची, असे त्यांचे तंत्र आहे. त्यात ते मंदिरे पाडण्यासाठी दबाव आणत असल्याने या कृतीच्या निषेधार्थ आणि मंदिर बचाव आंदोलनाला पाठिंबा मिळण्यासाठी "बंद'चे आवाहन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. शहरात चौफेर कडकडीत "बंद' पाळण्यात आल्याचेही आंदोलकांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधकांनी "बंद'साठी मंगळवारी सायंकाळी शहरात फेरी काढली. सामान्यांसह आग्रा रोडवरील भयभीत दुकानदारांनी मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून काही काळ दुकाने बंद ठेवली. विरोधक केवळ विकासाला विरोध करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांच्या विरोधामुळे लढण्यासाठी हत्तीचे बळ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार गोटे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

Web Title: dhule city closed to showing oppose to mla anil gote