
Dhule News : धुळे वीज कंपनीतील व्यवस्थापक, उपव्यवस्थापकांना 2 लाख भोवले
धुळे : येथील वीज कंपनी कार्यालयातील व्यवस्थापक, उपव्यवस्थापकाला दोन लाखांच्या लाच प्रकरणी अटकेत जावे लागले आहे. त्यामुळे वीज कंपनीत खळबळ उडाली.
तक्रारदार शासकीय विद्युत ठेकेदार आहे. त्याने २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात वीज कंपनीतर्फे धुळे जिल्ह्यात विद्युतीकरणासंदर्भात ठेका मिळाला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितींतर्गत निधी प्राप्त होता.
तक्रारदाराने दोंडाईचा विभाग, धुळे विभाग, धुळे ग्रामीण विभागात उद्दिष्टाप्रमाणे वेळेत शंभर टक्के काम पूर्ण केले. त्याचे कामाचे बिल ५६ लाख ३१ हजार ५९० रुपये झाले. ही रक्कम मंजुरीसाठी ठेकेदाराने वीज कंपनीच्या येथील कार्यालयाकडे प्रस्तावाद्वारे सादर केली. बिल मंजुरीसाठी तक्रारदाराने संबंधित कार्यालयात तगादा लावला.
बिल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना वीज कंपनीच्या वित्त विभागाचे व्यवस्थापक अमर खोंडे व उपव्यवस्थापक मनोज पगार यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच लाखांची रक्कम निश्चित झाली.
पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना संशयित खोंडे व पगार याला पकडण्यात आले.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच संशयित दोघे ताब्यात आहेत.