मुख्यमंत्रीसाहेब... धुळ्यासाठी तुम्ही एवढे कराच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

उद्योग, सिंचनाचा प्रश्‍न कायमचा सुटावा - जिल्हावासीयांच्या माफक अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ही इच्छा!

उद्योग, सिंचनाचा प्रश्‍न कायमचा सुटावा - जिल्हावासीयांच्या माफक अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ही इच्छा!

धुळे जिल्हा विकासाच्या मार्गावर आजही कोसो दूर आहे. सिंचनाच्या सुविधा पुरेशा नसल्याने, शेतीमालाला भाव नसल्यो आजही जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. बेरोजगारीमुळे येथील तरुण स्थलांतर करीत आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी नाडला जात आहे. सिंचनाचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आपण काही पावले उचलली आहेत. मात्र, त्याचे दृश्‍य परिणाम अजूनही दिसत नाहीत. तापीवर बॅरेजेस झालेय तेथील अथांग जलसाठा केवळ डोळ्यांत साठविण्यापलीकडे येथील शेतकरी काहीच करू शकत नाही. या नदीवरील बंद खासगी उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या कामाला गती मिळावी. काम मंजूर होऊन एक वर्ष निघून गेले. जामफळ उपसा योजनेला आपल्या सरकारच्या काळात चालना मिळाली, ती लवकर होवो. शिंदखेडा तालुक्‍याची भाग्यविधाती ठरणारी बुराई नदी बारमाही करण्याला आपण गती द्यावी. शिंदखेडा तालुका हा तसा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. सुदैवाने आता मंत्री रावल यांच्या रूपाने या तालुक्‍याचा विकासाची गंगा अवतरू शकेल, अशी आशा आहे. आपण त्यांना बळ देत आहातच. ते अधिक द्यावे, जेणेकरून आपण घोषित केलेल्या योजना मार्गी लागून जिल्हा विकासाच्या वाटेवर धावू शकेल. या सर्वांसाठी निधीची गरज आहे; पण कायम तृषार्त राहिलेल्या आमच्या जिल्ह्याला थोडे झुकते माप द्याच...

मोठे उद्योग नसल्याने येथील तरुणांना पुण्या-मुंबईकडे धाव घ्यावी लागते. शेजारील औरंगाबादचा चेहरामोहरा ‘डीएमआयसी’मुळे किती बदलला आहे. आमच्या धुळ्याचाही त्यात समावेश आहे; पण त्याबाबत अद्याप काहीच हालचाली नाहीत. आता मनमाड- इंदूर रेल्वेमार्गही मार्गी लागला आहे. नागपूर-सुरत महामार्गाचे चौपदरीकरणही होत आहे. बॅरेजेसमध्ये भरपूर पाणी आहे. ‘डीएमआयसी’ झाली तर येथे उद्योगांचे जाळे निर्माण होऊन बेरोजगारी दूर होईल. येथील उद्योग क्षेत्राच्या विकासाला गती येईल.
धुळे शहराच्या अस्मितेचे म्हणून प्रस्तावित कृषी विद्यापीठासाठी जरूर विचार करा. धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात त्यासाठी अनुकूलता आहे.

सरकारला विद्यापीठासाठी लागतो तसा फार मोठा खर्च करावा लागणार नाही. या संदर्भात समितीनेही धुळे अनुकूल असल्याचा अहवाल दिल्याचे सांगितले जाते. मग आणखी विचार करू नका. कायमच डावलले गेलेल्या धुळेकरांना न्याय द्या. येथे विद्यापीठ झाल्यास या भागाच्या कृषी विकासालाही चालना मिळू शकेल.

तसे धुळ्याचे अनेक प्रश्‍न आहेत. ते तुम्ही यथावकाश हाताळाल; पण मुख्य म्हणजे सिंचनाचा प्रश्‍न सुटला आणि शेतीमालाला रास्त भाव मिळाला तर येथील शेतकरी कधीच कर्जमाफी मागणार नाही. त्यासाठी आपण ठोस निर्णय घ्या. अक्कलपाडा निम्न पांझरा प्रकल्पाचे काम गेली २५ वर्षे सुरूच आहे. यंदाही तो शंभर टक्के भरेल की नाही याची खात्री नाही. शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या त्याचे पाणी मिळणार या आशेवर खपल्या. तसे तापीवरील बॅरेजेस अन्‌ अन्य प्रकल्पांचे होऊ नये. तसे न झाल्यास झाले शेतकरी वर्गालाही हे सरकार आपले आहे, असे नक्कीच वाटेल. इथल्या राजकीय हेव्यादाव्यांत या जिल्ह्याचा विकास कायम मागे राहिला. आपले सरकार तसे करणार नाही, ही आशा आहे. अन्यथा येथील जनतेची अवस्थाही ‘दोन दिवस दुःखात गेले, दोन वाट पाहण्यात गेले, हिशेब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे’ अशीच होईल.

धुळे जिल्हावासीयांतर्फे आपले भावपूर्ण स्वागत. तुम्ही येणार म्हणून आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. तुम्ही येणार म्हणून आम्ही आमचे प्रश्‍न मांडून रडगाणे गाऊ असेही नाही; पण आमच्या माफक अपेक्षापूर्तीच्या दिशेने तुम्ही नक्की पावले उचलाल, ही भाबडी आशा आहे. तुम्ही नागपूरकर असल्याने विकासात आणि सत्तेच्या समीकरणात खानदेश मागील काळात का मागे राहिला, हे जाणून असालच. असो, पण आता आम्हालाही विकासाची आस लागून आहे. तिच्या पूर्ततेसाठी आपण खानदेशच्या झोळीत थोडे- थोडे देत आला आहात. अडीच वर्षे झाली. आता ठोस काही तरी द्या, अशी आमची माफक मागणी आहे.
- बळवंत बोरसे, धुळे

Web Title: dhule facility demand by chief minister