एका झाडूसाठी विकला ५८ किलो तांदूळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

दहिवदच्या जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिकेचा प्रताप; यापुढे असे घडणार नसल्याचा माफीनामाही
शिरपूर - ‘शाळेत झाडू नव्हता. तो विकत घेण्यासाठी ५८ किलो तांदूळ विकला. यापुढे असे घडणार नाही. पुन्हा असा प्रकार आढळल्यास माफ करू नये....’ हा कोणत्या नाटकातील संवाद नसून, दहिवद (ता. शिरपूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहाराचा तांदूळ विकताना मुद्देमालासह सापडलेल्या मुख्याध्यापिकेने ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रातील माफीनामा आहे.

दहिवदच्या जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिकेचा प्रताप; यापुढे असे घडणार नसल्याचा माफीनामाही
शिरपूर - ‘शाळेत झाडू नव्हता. तो विकत घेण्यासाठी ५८ किलो तांदूळ विकला. यापुढे असे घडणार नाही. पुन्हा असा प्रकार आढळल्यास माफ करू नये....’ हा कोणत्या नाटकातील संवाद नसून, दहिवद (ता. शिरपूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहाराचा तांदूळ विकताना मुद्देमालासह सापडलेल्या मुख्याध्यापिकेने ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रातील माफीनामा आहे.

दहिवद येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराचा तांदूळ विकला जात असल्याचा संशय गावातील युवकांना होता. त्यामुळे त्यांनी शाळेवर पाळत ठेवली होती. शाळेची स्वच्छता कर्मचारी वत्सलाबाई यशवंत चित्ते (रा. काशिरामनगर, शिरपूर) ही आज दुपारी शाळेच्या शेजारीच असलेल्या संजय संतोष कुंभार यांच्या दुकानात तांदूळ घेऊन जाताना आढळली. युवकांनी जाब विचारल्यावर तिने झाडू विकत घेण्यासाठी तांदूळ विकत असल्याचे सांगितले. तिला मुख्याध्यापिका सुरेखा नारायण वाघ यांच्याकडे नेण्यात आले. श्रीमती वाघ यांनीही झाडू विकत घेण्यासाठी तांदूळ विकत असल्याची कबुली दिली. 

या घटनेचे वृत्त कळताच सरपंच चंद्रकांत चव्हाण, पोलिसपाटील रावसाहेब पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गोकुळ बागूल, मयूर राजपूत, गणेश भदाणे आदी शाळेत जाऊन पोहोचले. त्यांनी घडल्या प्रकाराबाबत शिरपूर पंचायत समितीशी संपर्क साधला. मात्र, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तंबी दिल्यावर केंद्रप्रमुखाला पाठवून पंचनामा करण्यात आला. त्यात शाळेच्या ‘रेकॉर्ड’ला एकूण ११० किलो तांदूळ असून, यापूर्वीही प्रत्येकी ६० किलो तांदूळ दोनदा विकल्याचे नमूद केले आहे. 

मुख्याध्यापिकेचे पत्र
तांदूळ विक्रीत रंगेहाथ सापडल्यानंतर सारवासारव करण्यासाठी मुख्याध्यापिकेने सरपंचांना लेखी खुलासेवजा पत्र दिले आहे. त्यात शाळेसाठी झाडू विकत घेण्यासाठी तांदूळ विकला. यापुढे असे घडणार नाही. घडल्यास पुन्हा माफ करू नये, असे म्हटले आहे.

झाडूआडून सुरू होती चोरी 
झाडूची किंमत किती, एकूण विकलेल्या १७८ किलो तांदळाची किंमत किती, असा प्रश्न या प्रकरणाने उपस्थित झाला आहे. शालेय पोषण आहाराचे धान्य खुलेआम काळ्या बाजारात विकण्याचे प्रकार तालुक्‍यात नवे नाहीत. मात्र, संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याऐवजी त्यांचा खासगी न्यायनिवाडा करण्याचे काम ‘बीडीओ’ व शिक्षण विभागाकडून होत असते. त्यामुळे धान्य विक्रीचे प्रकार कायम घडत आहेत. दहिवद जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ विक्रीतील संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

‘सर्व शिक्षण’चे अनुदान गेले कुठे?
शाळेसाठी झाडू, बादली, टाचण्या, रबर आदी दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी सर्व शिक्षण अभियानातून पाच ते सहा हजारांचा निधी दिला जातो. यातून या तत्सम वस्तू खरेदी करता येतात. मग झाडू विकत घेण्यासाठी चक्क ५८ किलो तांदूळ विकावा लागला, हे म्हणणे कुणालाही पटणारे नाही. सर्व शिक्षण अभियानातून देण्यात येणारी रक्कम गेली कुठे? या शाळेतून आतापर्यंत असे प्रकार तीनदा घडल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. झाडूसाठी तांदूळ विकावा लागला हे म्हणणे संयुक्तिकच नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापिकेविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: dhule jalgav news rice scam in dhule