जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर गर्दे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर गर्दे यांचे निधन 
धुळेः कॉंग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, समाजकल्याण सभापती, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे खंदे समर्थक मधुकर गर्दे उपाख्य भाऊसाहेब यांचे (वय 64) आज पहाटे पाचला दीर्घ आजाराने नाशिक येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी चारला मूळ गावी सडगाव (ता. धुळे) येथील जे. टी. गर्दे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील समाजकारण आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

मधुकर गर्दे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दोन दिवसांपासून नाशिक येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे पाचला त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी बाराला त्यांचे पार्थिव धुळे येथील जयहिंद कॉलनीतील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 
30 जानेवारी 1956 ला त्यांचा सडगाव येथे जन्म झाला. 1976 पासून ते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत राजकारणात सक्रिय झाले. सडगावच्या सरपंचपदापासून धुळे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी विविध पदे यशस्वीपणे सांभाळली. 1987 ते 1990 या काळात ते धुळे पंचायत समितीचे सभापतीही होते. धुळे तालुका दूध संघाचे अध्यक्ष, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व विविध समित्यांच्या सभापतिपदीही ते कार्यरत होते. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त, महाराष्ट्र राज्य जलनिस्सारण महामंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळावरही त्यांची नियुक्‍ती झाली होती. कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे एकनिष्ठ आणि खंदे समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख होती. गर्दे यांचा दांडगा जनसंपर्क, वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या प्रभुत्वामुळे सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. जवाहर गटाची बुलंद तोफ आणि चाणक्‍य म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणासह समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhule marathi news congres nete madhukar garde deth