प्रवासी वाहनातून खुलेआम नशेच्या औषधांची आवक 

प्रवासी वाहनातून खुलेआम नशेच्या औषधांची आवक 

धुळेः गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, इंदूरहून नशेच्या औषधी गोळ्या, सिरपची धुळ्यात मोठी आवक होते. ती खुलेआम खासगी प्रवासी वाहतुकीद्वारे होते. गुजरातमधून स्वस्तात खरेदी होणारा हा नशेचा माल येथे नशेखोरांना तिप्पट, चौपट किमतीला विक्री होतो. राज्यात या नशेच्या औषधी गोळ्या, सिरपच्या खरेदी- विक्रीचा धुळेच मुख्य अड्डा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

धुळे शहरासह परिसरातील मुस्लिमबहुल आणि अल्पविकसित भागातील शेकडो लहानगी मुले, तरुण नशेखोरीत गुरफटले आहेत. त्यांना "टार्गेट' करत नशेखोरीच्या वस्तू, पदार्थ पुरवठा करणारे गैर"एजंट'चे रॅकेटच येथे सक्रिय आहे. त्यात बड्या व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. अशा गैर"एजंट'ने गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, इंदूर येथील मेडिसन मार्केटमध्ये आपले बस्तान बसविले. तेथून स्वस्तात नशेच्या औषधांची खरेदी करायची आणि धुळ्यात नशेखोरांना तिप्पट, चौपट किमतीत विक्री करून रग्गड कमाई करायची, अशी गैर"एजंट'ची कार्यपद्‌धती आहे. त्यातून त्यांनी या व्यवसायात घट्टपणे पाय रोवले आहेत. हा प्रश्‍न समाजात दुर्लक्षित राहात असल्या कारणाने गैर"एजंट'ने या संधीचा पुरेपूर लाभ उठवला आहे. 

नशेबाजांना खुलेआम पुरवठा 
गुजरातमधून खासगी प्रवासी वाहनातून नशेच्या औषधी गोळ्या, सिरपची येथे आवक होते. विशेषतः रात्री येणाऱ्या वाहनांमधून बेमालूमपणे नशेच्या औषधांचा साठा उतरविला जातो. काही वेळेस एसटी बसेसचा वापर होतो. रात्री आणि पहाटे अशा वाहनांमधून नशेची औषधे आणली जात असली तरी कुणाला कसलाही संशय येणार नाही, अशा पद्‌धतीची व्यवस्था गैर"एजंट'ने निर्माण केली आहे. याद्वारे विविध कंपनीच्या पेनकिलर, झोपेसह खोकल्यावरची औषधे व गोळ्या नशेखोर तरुणांना पुरविल्या जातात. यात डी कॉक, रेक्‍सकॉफ, कोरेक्‍स, कोडीन, कोडीडेक्‍स ही खोकल्यावरची औषधे (सिरप), तर ऍलप्रीरेक्‍स, ऍलप्राकॉक्‍स, ऍझिलीप, डायझाफेन (सर्व पॉइंट फाइव्ह एमजी), नायट्रोझीपाम (टेन एमजी) या झोपेसह गुंगी आणणाऱ्या गोळ्या, महिलांच्या पोटदुखीवरील स्पाझमोप्रॉक्‍सीवन ही गोळी नशेबाजांना खुलेआम दिली जाते. 

दर्जा, गुणवत्ता नाही 
नशेबाजांना दिली जाणारी नशेची औषधे गुजरातमधील "डी मार्केट'मधून येत असल्याने दर्जा, गुणवत्तेचा प्रश्‍न नाही. नशेच्या आहारी गेलेली मुले, तरुण वाटेल त्या किमतीला औषध घेतात. प्रसंगी त्यासाठी चोऱ्यामाऱ्या, लूट यासारखे गुन्हे करतात. अशा औषधांच्या आपल्या शरीरावर काय विपरीत परिणाम होत असेल याचा कुठलाही विचार न करता नशेबाजांची मोठी टोळी येथे निर्माण झाली आहे. त्यांचे अड्डे येथे लपून राहिलेले नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com