खानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र! 

कैलास शिंदे, जळगाव 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

धुळे महापालिका आणि शेंदुर्णी पालिकेच्या निवडणुकीत "कमळ' फुलले. भाजपने दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा पराभव करून सत्तेचा झेंडा फडकावला. जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, पालघर लोकसभा पोटनिवडणूक, जामनेर व जळगाव महापालिकेनंतर धुळे मनपात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. धुळे मनपातील विजयाचा भाजपचा आनंद मात्र औट घटकेचा ठरला. दुसऱ्याच दिवशी पाच राज्यांमधील निवडणुकीत पक्षाला पराभवाचा धक्का बसला. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी खानदेशातील काही नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाला ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पक्षावरील नाराजीची किनार असल्याने खानदेश हे आगामी काळात राजकीय उलथापालथीचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. 

धुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. या शिवाय प्रथमच नगरपंचायत झालेल्या शेंदुर्णीवरही पक्षाचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे या निवडणुका जलसंपदामंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या गेल्या. या यशामुळे महाजन यांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी जबाबदारी द्यावी अन्‌ महाजनांनी निवडणूक जिंकावी, हे सूत्रच राज्यात झाले आहे. त्यामुळे महाजनांना भाजपचा "हुकमी एक्का' म्हटले जात आहे. या दोन्ही निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे खानदेशात भाजपची ताकद वाढली आहे, हे निश्‍चित. 

इकडे आनंद, तिकडे निराशा 
खानदेशातील दोन्ही पालिकांच्या यशाचा आनंद भाजप घेत असतानाच देशातील पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल पक्षाच्या दृष्टीने निराशाजनक आले. या ठिकाणी पक्षाचा पराभव झाला. विशेषतः मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यातील भाजपच्या पराभवामुळे आगामी लोकसभेची गणिते मांडली जाऊ लागली. याचा फायदा महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जाऊ लागली. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून भाजपत गेलेला खानदेशातील मोठा नेता पुन्हा पक्षात "घरवापसी' करणार असल्याचा गौप्यस्फोट एका वाहिनीला मुलाखत देताना केला. त्यामुळे खानदेशातील राजकारणात फेरबदल होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे खानदेशातील दोन्ही पालिकांतील यश भाजपला फारसे लाभदायक ठरणार नाही काय, असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. 

विरोधक कमकुवत 
खानदेशातील दोन्ही पालिकांतील यशाचा विचार केल्यास दोन्ही ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचा पराभव केला आहे. दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी संयुक्तपणे लढली, मात्र त्यांना यश आले नाही. खानदेशात आज कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस कमजोर आहे. येथील नेत्यांना भाजपमधील दुफळीचा फायदाही घेता येत नसल्याचे दिसत आहे. धुळ्यात भाजप आमदार अनिल गोटे यांनीच भाजपला आव्हान दिले होते. त्या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष होता. त्यामुळे या दुफळीचा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला फायदा घेता आला असता. परंतु दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने त्याबाबत फारशी आखणी केल्याचे दिसून आले नाही. जळगावातही भाजपवर एकनाथराव खडसेंची असलेली नाराजी आणि जिल्ह्यातील नेतृत्वात पडलेली फूट ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीत "कॅश' करू शकली नाही. या दोन्ही पक्षांत सक्षम नेतृत्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे भाजप कमजोर होऊनही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी एकत्र असूनही त्यांना पराभव करण्याची रचना करू शकत नाही, असे चित्र दिसून आले आहे. 

आघाडीला हवी व्यूहरचना 
आता तरी खानदेशातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पक्ष बळकटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तीन राज्यांतील यशामुळे राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळेल, असे म्हटले जात आहे. तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोडून भाजपत गेलेले परत येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत होण्याचे भाकीत वर्तविले जात आहे. मात्र, यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही तेवढीच सक्षम व्यूहरचना असण्याची गरज आहे. आगामी काळात दोन्ही पक्षांचे नेते त्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. 

फायदा कुणाला? 
भाजपला दोन्ही पालिकांतील विजयाने बळ मिळाले आहे. मात्र तीन राज्यातील पराभवाने धक्का बसला असला, तरी पक्षनेतृत्व आता पक्षातील "डॅमेज कंट्रोल' रोखण्यासाठी पावले उचलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेंदुर्णी नगरपंचायत व धुळे महापालिकेत भाजपच्या यशाचे आणि तीनही राज्यांतील कॉंग्रेसच्या यशाचा खानदेशात नक्की कुणाला फायदा होणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Dhule muhapalika & shendurni palika corporation politics