धुळे ः अतिवृष्टीसह अन्य कामांमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असताना प्रवेशद्वारावर 70 लाख रुपये खर्च करणे सध्या तरी सयुक्तिक ठरत नाही, असे मत मांडणाऱ्या सदस्यांचा आवाज आज महापालिकेच्या स्थायी समिती सभेत कमी पडला. दुसरीकडे प्रवेशद्वारामुळे विकास होणार, शहराच्या सौंदर्यात भर पडणार, असा तर्क मांडणाऱ्या सदस्यांचाच आवाज भारी पडल्याने प्रवेशद्वार उभारण्यास अखेर मंजुरी देण्यात आली.
येथील महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज सकाळी अकराला सभागृहात झाली. सभापती युवराज पाटील, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. समितीपुढे तीन विषय कार्योत्तर खर्चाला मंजुरीचे होते. यात साक्री रोड परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीवर झालेल्या 73 हजार 737 रुपये खर्चाला समितीने मंजुरी दिली. मात्र, हद्दवाढ क्षेत्रातील हातपंप दुरुस्तीसाठी झालेला एक लाख 10 हजार 831 रुपये, तसेच हनुमान टेकडीपासून मुख्य जलवाहिनीला विविध ठिकाणी लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीवर झालेल्या दोन लाख 95 हजार 554 रुपये खर्चावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.
सहा महिन्यांपासून मागणी
सदस्य संजय भिल यांनी, सहा महिन्यांपासून आपण वरखेडी येथील हातपंप दुरुस्तीची मागणी करत आहोत. मात्र, दुरुस्ती होत नाही. मग हद्दवाढ क्षेत्रात कुठे हातपंप दुरुस्त केले त्याची माहिती द्या, अशी मागणी केली.
प्रवेशद्वारापेक्षा इतर कामे महत्त्वाची
शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरातील मोठ्या पुलावर 70 लाख रुपये खर्चातून प्रवेशद्वार उभारण्याच्या विषयावर सदस्य खताळ यांनी विरोध दर्शविला. शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे, एका बारा वर्षाच्या मुलाचा खड्ड्यात पडल्याने अपघात झाला. खड्डे बुजवायला 50 हजार रुपये मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वारावर 70 लाख रुपये खर्च करणे आवश्यक वाटत नाही. पुतळे, कमानीपेक्षा महत्त्वाची अनेक कामे आहेत. त्यामुळे माझा विरोध नोंदवा, अशी स्पष्ट भूमिका श्री. खताळ यांनी घेतली. दुसरीकडे अमीन पटेल यांनीही या मताशी सहमती दर्शविली. नंतर मात्र नरमाईची भूमिका घेत विकासाला विरोध नाही; पण शहराच्या एकाच भागात विकास नको. आमच्या प्रभागातील शंभर फुटी रस्त्यावरही कमान उभारा, अशी मागणी केली.
कमानीसाठी बोरसेंचा युक्तिवाद
सदस्य नागसेन बोरसे 70 लाखांच्या प्रवेशद्वाराबाबत युक्तिवाद मांडण्यासाठी उतरले. मुळात विकास म्हणजे काय हेच लोकांना कळत नाही. स्वागत कमान खूप सुंदर आहे. त्याने शहराच्या सौंदर्यात भर पडेल. खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. खड्डे बुजवायला 50 लाखांची तरतूद आहे ती एक कोटी करू, रस्ते तर होणारच आहेत, असे विविध तर्क त्यांनी कमानीच्या समर्थनासाठी मांडले. त्यांच्या या युक्तिवादानंतर विषय मंजूर करण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.