शिक्षण मंडळ सदस्यांचा कार्यभार उपायुक्तांकडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

धुळे - धुळे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने सभापती, उपसभापतींसह सर्व सदस्यांची पदे रद्द झाली आहेत. मंडळाकडील कारभार आता आहरण व वितरण अधिकारी (डीडीओ) तथा उपायुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

धुळे - धुळे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने सभापती, उपसभापतींसह सर्व सदस्यांची पदे रद्द झाली आहेत. मंडळाकडील कारभार आता आहरण व वितरण अधिकारी (डीडीओ) तथा उपायुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

नगरपालिका असताना महापालिका शिक्षण मंडळ अस्तित्वात होते. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या महापालिका शाळांचे व्यवस्थापन केले जायचे. शासनस्तरावरून मात्र राज्यातील सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळांचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासंदर्भात हालचाली झाल्यानंतर राज्यातील काही महापालिकांमधील शिक्षण मंडळाचे पदाधिकारी न्यायालयात गेले होते. ही बाब अद्यापही न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ज्या महापालिकांमधील शिक्षण मंडळ सदस्यांचा कार्यकाळ संपला तेथे नवीन संचालक मंडळ न घेता प्रशासनाकडे कार्यभार सोपविण्यात येत आहे. 2012 मध्ये धुळे महापालिका शिक्षण मंडळावर नवीन 14 सदस्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले होते. सभापतिपदी संदीप महाले, तर उपसभापतिपदी गुफरान शेठ होते. या सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपला आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी, सदस्यांचे पद आता रद्द झाले आहे. 

शिक्षण मंडळाचा कार्यकाळ संपल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार 23 फेब्रुवारी 2017 पासून उपायुक्त रवींद्र जाधव यांनी मनपा शिक्षण मंडळाकडील आहरण व वितरण अधिकारी (डीडीओ) म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. 

Web Title: dhule municipal corporation education committee