कचऱ्याचा फोटो पाठवा...बारा तासात निराकरण! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

धुळे : शहरातील कचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर तक्रारीचा पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही असा आजपर्यंतचा सर्वसाधारण अनुभव... आता मात्र आपण केलेल्या तक्रारीचे निवारण बारा तासात होणार आहे. अँड्रॉईड मोबाईलने कचऱ्याचा फोटो काढा... तो सेंड करा... महापालिकेची संबंधित यंत्रणा बारा तासात तक्रार सोडवेल. 'स्वच्छता ऍप्स'च्या माध्यमातून ही कमाल साध्य होणार आहे. 

धुळे : शहरातील कचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर तक्रारीचा पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही असा आजपर्यंतचा सर्वसाधारण अनुभव... आता मात्र आपण केलेल्या तक्रारीचे निवारण बारा तासात होणार आहे. अँड्रॉईड मोबाईलने कचऱ्याचा फोटो काढा... तो सेंड करा... महापालिकेची संबंधित यंत्रणा बारा तासात तक्रार सोडवेल. 'स्वच्छता ऍप्स'च्या माध्यमातून ही कमाल साध्य होणार आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण-2017 अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच कार्यक्रमात 'जनाग्र' या संस्थेने 'स्वच्छता एमओयुडी' तयार केले आहे. या ऍप्सविषयी जनाग्रचे समन्वयक आशिष पुरी यांनी आज महापालिकेत सादरीकरण केले. आयुक्त संगीता धायगुडे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक, ओव्हरसियर्स उपस्थित होते. 

अशी तक्रार करता येईल 
रस्त्याने जाताना अथवा आपल्या आजूबाजूला सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा दिसल्यास त्याचा आपल्या अँड्रॉईड मोबाईलने फोटो काढायचा, हाच फोटो 'स्वच्छता एमओयुडी' ऍप्सच्या माध्यमातून अपलोड करायचा. फोटो सेंड झाल्यानंतर हा फोटो महापालिकेच्या संबंधित यंत्रणेकडे येईल व नोडल ऑफिसर संबंधित भागातील स्वच्छता निरीक्षकाकडे तो फोटो पाठवेल. 

बारा तासात निवारण 
तक्रार प्राप्त झाल्यानंतर बारा तासात या तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक असणार आहे. कारण तक्रारीचे निवारण झाल्यानंतर तसा फोटो शासनाच्या पोर्टलवर अपलोड करणे स्वच्छता निरीक्षकाला आवश्‍यक असणार आहे. 

मनपात यंत्रणा कार्यान्वित 
'स्वच्छता एमओयुडी' ऍप्सच्या माध्यमातून तक्रार निवारणाची यंत्रणा महापालिकेने कार्यान्वित केली आहे. सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा व स्वच्छ सर्वेक्षण-2017 मध्ये सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले आहे. 

असे करा ऍप डाऊनलोड... 
- ओपन गुगल प्ले स्टोअर 
- सर्च 'स्वच्छता एमओयूडी' (swachhata MoUD) ऍप्स 
- डाऊनलोड करा व इन्स्टॉल करा. 

सुविधेचे खास वैशिष्ट 
-अप्सद्वारे फोटो काढल्यानंतर ज्या ठिकाणचा फोटो आहे त्याचा पत्ता आपोआप यंत्रणेकडे जातो (जिओ टॅग सिस्टीममुळे). 
- तक्रार निवारण करणाऱ्या यंत्रणेला निश्‍चित ठिकाण कळते. 
- स्वच्छ सर्वेक्षण-2017 अंतर्गत ऍप्स डाऊनलोड करणे व त्याचा वापर करण्याला गुण मिळणार. 
- स्वच्छ सर्वेक्षण-2017 ची माहिती 1969 या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध.

Web Title: Dhule Municipal Corporation introduces mobile app