धुळे : 4 कोटींतून वॉल कंपाउंड, दीड कोटीतून आरोग्य केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

धुळे : 4 कोटींतून वॉल कंपाउंड, दीड कोटीतून आरोग्य केंद्र

धुळे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चार कोटी रुपये खर्चातून शहरातीच्या विविध भागांतील शासकीय व मोकळ्या भूखंडांना संरक्षक भिंत बांधणे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत एक कोटी ५९ लाख रुपये खर्चातून शहरातील साक्री रोड भागातील जोरावर अली सोसायटी येथे तसेच वरखेडी येथे आरोग्य केंद्र बांधणे, महापालिकेच्या दवाखान्यांसाठी ३० लाख रुपये खर्चातून औषध खरेदी, अशा साधारण सहा कोटी रुपयांच्या खर्चाची कामे व खरेदी तथा निविदा प्रक्रियेसाठी स्थायी समितीने मंजुरी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीची गुरुवारी (ता. २६) साप्ताहिक सभा झाली. सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतून मोकळ्या जागांना संरक्षक भिंत बांधण्याचे विषय होते.

हेही वाचा: Nashik : इंधनावरील कर कपातीची घोषणा हवेतच

चार कोटींचे विषय मंजूर

गट नंबर ५५४ विशाल इस्टेट, ५४२ विशाल इस्टेट, ५४३ विशाल इस्टेट व सर्वे नंबर ३५ हनुमान मंदिर भागात मोकळ्या जागेवर अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामांसाठी एकूण एक कोटी १५ लाख ७७ हजार रुपये खर्चात तांत्रिक मान्यता होती. या कामांसाठी व्ही. आर. पवार यांची अंदाजपत्रकीय दराने आलेली निविदा मंजूर करण्यात आली. तसेच गट नंबर-३/१ब/३/३ब/६/२/१अ,१५/१/अ, १५/१/ब, १५/२/अ, १५/२/ब, ५२३/३ अजळकरनगरमधील मोकळ्या जागांना संरक्षक भिंत बांधणासाठी एकूण दोन कोटी ८७ लाख ४५ हजार रुपये खर्चास तांत्रिक मान्यता होती. या कामांसाठी अंदाजपत्रकीय दराने आलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शनच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका क्षेत्रातील नगर भूमापन क्रमांक-१२७२१ सर्व्हे नंबर-४४४/१ अ येथील शासकीय जमिनीवर ५९ लाख ९९ हजार ९४४ रुपये खर्चातून संरक्षक भिंत बांधण्याचचा विषय होता. सविस्तर माहिती नसल्याने हा विषय तहकूब केला.

दोन नवीन आरोग्य केंद्र

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील साक्री रोड भागातील जोरावर अली सोसायटी येथे व वरखेडी येथे नवीन आरोग्य केंद्र बांधण्यासाठी निविदा दर मागविले होते. या दोन्ही आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी ७९ लाख ९६ हजार ३५० रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी होती. यातील जोरावर अली सोसायटीतील कामासाठी ११ टक्के कमी दराची हिंद कन्स्ट्रक्शनची, तर वरखेडी येथील कामासाठी पाच टक्के कमी दराची हिंद कन्स्ट्रक्शनचीच निविदा होती. या दोन्ही विषयांनाही स्थायीने मंजुरी दिली. महापालिकेच्या १६ दवाखान्यांसाठी लागणाऱ्या ९२ प्रकारच्या ॲलापॅथी औषध खरेदीसाठी २९ लाख ९४ हजार ३०२ रुपये खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणे व निविदा प्रसिद्ध करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

हेही वाचा: ‘डाएट’मधील शिक्षकांच्या वेतनासाठी अखेर 9 कोटी

दवाखान्यांत डॉक्टरच नसतात

सदस्या किरण कुलेवार यांनी प्रभागातील मनपाच्या दवाखान्यात नियोजित वेळेवर डॉक्टरच उपलब्ध नसतात. केवळ आशा वर्कर असतात, अशी तक्रार केली. त्यावर अहवाल सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. सदस्य साबीर शेठ यांनी कचरा संकलनाचा ठेका माती भरण्यासाठी दिला आहे का ,असा सवाल केला. जयशंकर कॉलनीतील पथदीप बंद असल्याचीही त्यांनी पुन्हा तक्रार केली. नरेश चौधरी यांनी कुमारनगर पुलावर प्रचंड खड्डे पडल्याने ते पावसाळ्यापूर्वी बुजवा, अशी मागणी केली.

Web Title: Dhule Municipal Corporation Provide Funds For Development Projects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top