धुळ्यात सात अधिकाऱ्यांना 35 हजाराचा दंड!

रमाकांत घोडराज
शुक्रवार, 19 मे 2017

धुळे: महापालिका क्षेत्रातील विस्कळित पाणीपुरवठा, अतिक्रमण, कचरा, प्लास्टिक पिशव्या आदी बाबी प्रकरणी आयुक्त संगीता धायगुडे यांनी बेजबाबदार, कामचुकार, उदासीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट दंड आकारणी सुरू केली आहे. त्यांच्या अशा कठोर पवित्र्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

दोन दिवसात सात अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजाराप्रमाणे एकूण 35 हजाराचा दंड आयुक्तांनी ठोठावला आहे. विस्कळित पाणीपुरवठा व इतर प्रश्‍नांबाबत भाजप, शिवसेना, समाजवादी पक्षाकडून आंदोलने झाल्याने, त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरत टीका केल्याने आणि महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारल्याने आयुक्त धायगुडे यांचा पारा चढला आहे. त्यात त्यांनी हाताखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा चंग बांधला आहे. विस्कळित पाणीपुरवठा प्रकरणी अभियंता कैलास शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे ओव्हरसियर सी. एम. उगले, सी. सी. बागूल, एस. बी. विसपुते, हेमंत पावटे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आयुक्तांनी ठोठावला आहे. मेच्या वेतनातून हा दंड कपात केला जाईल. विस्कळित पाणीपुरवठा प्रकरणी उपायुक्त रवींद्र जाधव यांनाही आयुक्‍तांनी नोटीस बजावण्यात आली. तसेच सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी यांनाही प्रत्येकी पाच हजाराचा दंड आज आयुक्तांनी आकारला. सहाय्यक आयुक्त अनुप डुरे यांनी रोज प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासावी, लेटलतीफांना वठणीवर आणावे, अशी सक्त सूचनाही आयुक्त धायगुडे यांनी दिली आहे. या भूमिकेचे धुळेकर स्वागत करीत आहेत.

Web Title: dhule municipal fine 35 officers