धुळेः कर्जमाफीतील वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर कोटी जमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

निधी वाटपात धुळे जिल्हा बॅंक नाशिक विभागात प्रथम

धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतेंतर्गत धुळे जिल्ह्यात पात्र 20 हजार 552 शेतकऱ्यांना 100 कोटी 67 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी आज (मंगळवार) दिली. यात 19 राष्ट्रीयकृत बॅंक शाखांसह धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला प्राप्त निधीचे शंभर टक्के वाटप झाले. लाभ निधी वाटप करणारी जिल्हा सहकारी बॅंक नाशिक विभागात पहिली ठरली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात निधी जमा झाला आहे.

निधी वाटपात धुळे जिल्हा बॅंक नाशिक विभागात प्रथम

धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतेंतर्गत धुळे जिल्ह्यात पात्र 20 हजार 552 शेतकऱ्यांना 100 कोटी 67 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी आज (मंगळवार) दिली. यात 19 राष्ट्रीयकृत बॅंक शाखांसह धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला प्राप्त निधीचे शंभर टक्के वाटप झाले. लाभ निधी वाटप करणारी जिल्हा सहकारी बॅंक नाशिक विभागात पहिली ठरली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात निधी जमा झाला आहे.

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेंतर्गत धुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 13 हजार 361 शेतकऱ्यांना 50 कोटी 45 लक्ष 84 हजार 923 रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना "एसएमएस'व्दारे ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या खातेदार 7 हजार 191 शेतकऱ्यांच्या खात्यात 50 कोटी 22 लाखांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.

कर्जमाफीचा निर्णय
राज्यासह जिल्ह्यात 2012 ते 2013 ते 2015- 2016 या सलग चार वर्षात अपुऱ्या पावसामुळे खरीप, रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती. काही भागात अवेळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. त्यामुळे ते थकबाकीदार झाले. बॅंकांकडून नव्याने पीक कर्ज घेण्यास ते पात्र झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारने थकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला.

लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन
विविध निकषांप्रमाणे कर्जमाफीचा लाभ घेताना धुळे जिल्ह्यातील दीड लाख रुपयांवरील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना एक वेळ समझोता योजनेंतर्गत (OTS) दीड लाख रुपयांवरील रक्कम जिल्हा बॅंकेच्या संबंधित शाखेकडे 31 मार्च 2018 च्या आत जमा करणे आवश्‍यक आहे. जिल्हा बॅंक व इतर बॅंकेकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, तर अशा शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारने दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजेच 31 मार्च 2018 पर्यंत संबंधित बॅंकेत रकमेचा भरणा करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.

पुढील वर्षी कर्जासाठी पात्र
योजनेत जे शेतकरी कर्जमुक्त झाले. ते पुढील वर्षी पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतील. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव, बॅंक तपासणीस, विशेष वसुली अधिकारी, विभागीय अधिकारी, बॅंकांचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग एक, राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवस्थापक, अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर आदींचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा उपनिबंधक ठाकूर यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात धुळे जिल्ह्यातील कर्जमाफी
- धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार 552 शेतकऱ्यांना लाभ
- धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 100 कोटी 67 लाखांचा निधी जमा
- धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेच्या 13 हजार 361 शेतकऱ्यांना लाभ
- या शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 50 कोटी 84 लाख 84 हजाराचा निधी जमा
- राष्ट्रीयकृत बॅंकेच्या 7 हजार 191 शेतकऱ्यांच्या खात्यात 50 कोटी 22 लाख रुपये जमा
- धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे 13 हजार शेतकऱ्यांना लाभाचा "एसएमएस'

Web Title: dhule news 100 crores of deposits in the account of 20,000 farmers of debt waiver