धुळे : गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी 18 मारेकऱ्यांना 'मोक्का' 

Dhule
Dhule

धुळे : कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मान्य केल्याने 18 मारेकऱ्यांना "मोक्का' लागला आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला हादरा बसला आहे. 

18 जुलैला थरारक हत्याकांड 
शहरात वर्दळीच्या पारोळा रोडवर गोपाल टी हाऊससह समोरील रस्त्यावर 18 जुलैला सकाळी सव्वासहाला गुंड गुड्ड्याचे हत्याकांड झाले. मिरची पावडरसह पिस्तूल, तलवारी, सळई सारख्या घातक शस्त्रांनी 12 ते 13 मारेकऱ्यांनी गुंड गुड्ड्याची निर्घृण हत्या केली. त्याच्यावर मारेकऱ्यांनी तलवारीचे 20 ते 25 सपासप वार केले. नंतर या हत्याकांडाची सीसीटीव्ही फुटेजची क्‍लिप देशभरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे पोलिस यंत्रणेने फरार मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू केला. 

"ते' 18 मारेकरी कोण? 
पोलिसांच्या सात पथकांनी 22 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत राज्यासह परराज्यातून ठिकठिकाणाहून प्रमुख 11 मारेकरी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. ते सर्व न्यायालयीन कोठडीत असून आरोपी श्‍याम गोयर आणि विजय श्‍याम गोयर अद्याप फरार आहेत. हत्याकांड प्रकरणी आरोपी श्‍याम गोयर, विकी ऊर्फ विकास श्‍याम गोयर, विजय श्‍याम गोयर, विलास श्‍याम गोयर, सागर पवार ऊर्फ कट्टी, अभय ऊर्फ दादू देवरे, राजेश देवरे ऊर्फ भद्रा, भीमा देवरे, पारस घारू, गणेश बिवाल, योगेश जगताप, विकी चावरे, आबा भिका जगताप (रा. धुळे) आणि मारेकऱ्यांना आश्रय देणारे आरोपी योगेश जयस्वाल (धुळे), प्रकाश मोरे (उल्हासनगर), महेंद्र खैरनार (कासारे, ता. साक्री), राकेश सोनार (नाशिक), लखन जेधे (संगमनेर, जि. नगर) यांना "मोक्का' लागला आहे. 

पोलिस प्रशासनाला यश 
अनेक अडथळे असतानाही जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी कठोर भूमिका घेत आणि आपल्या सहकाऱ्यांवर विश्‍वास दर्शवत तपासाला गती दिली. त्यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या सहकार्याने पोलिस उपअधीक्षक तथा तपास अधिकारी हिंमत जाधव, "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी व पथकातील अधिकाऱ्यांनी हत्याकांडाशीनिगडीत 16 मारेकऱ्यांना अल्पावधीत जेरबंद केले. आरोपींना "मोक्का' लावला जाईल आणि त्यांना जन्मठेपेचीच शिक्षा होईल इतके सबळ पुरावे संकलित होतील, अशी ग्वाही प्रशासनातर्फे श्री. पानसरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रशासनाने एकूण 18 मारेकऱ्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील विविध कलमान्वये "मोक्का' लावला जावा, असा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश मेकला यांच्याकडे सादर केला. त्यांची गांभीर्याने दखल घेत श्री. मेकला यांनी गुड्ड्या हत्याकांड प्रकरणी गुन्ह्यात 18 मारेकऱ्यांना "मोक्का'चे वाढीव कलम लावण्यास मान्यता दिली. त्यामुळे शहरातील गुंडगिरी, गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या या कारवाईला मोठे यश मिळाल्याचे मानले जाते. 

"तो' जबाब धरला ग्राह्य : पानसरे 
गुड्ड्याच्या हत्याकांडातील 18 मारेकऱ्यांना "मोक्का' लागण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर दिला गेलेला कबुली जबाब ग्राह्य धरला गेला. अशा जबाबाला महत्त्व असते. या गुन्ह्यात तरतुदीनुसार "मोक्का' लागल्याने तपासाला 90 ऐवजी 180 दिवस मिळतील, तर चौदा दिवसांऐवजी 30 दिवसांची पोलिस कोठडी मारेकऱ्यांना मिळेल. "मोक्का'च्या कारवाईतून दोषी व्यक्तीची सहजासहजी सुटका होत नाही. त्यामुळे 18 मारेकरी पुढील सात ते आठ वर्षे कारागृहात राहू शकतील. "मोक्का'च्या निर्णयाची माहिती शहर पोलिस ठाण्यात नोंदवून जिल्हा न्यायालयाला दिली जाईल, असे अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com