धुळ्यातील मायलेकांसह चौघे पाटणेजवळ ठार

धुळ्यातील मायलेकांसह चौघे पाटणेजवळ ठार

तिहेरी अपघातात पती चिंतन जखमी; पुढच्याने ब्रेक दाबल्याने कार आदळली

धुळे/मालेगाव - मुंबई- आग्रा महामार्गावरील पाटणे फाटा येथे जीप (एक्‍सयूव्ही), स्विफ्ट कार व कंटेनर यांच्या तिहेरी अपघातात धुळ्यातील मायलेकांसह चौघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये प्राची चिंतन दवे (वय ३२), त्यांचा मुलगा शिवाय (वय १) यांच्यासह प्राची यांची बहीण रुची चंद्रकांत शहा (२८, तिघे रा. धुळे) या एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. पती चिंतन दवे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

धुळे येथील दवे कुटुंबीय कामानिमित्त मुंबईला गेले होते. बुधवारी (२८ जून) रात्री ते नाशिकमध्ये मुक्कामी होते. काम आटोपून आज दुपारी कारने (एमएच १८, एजे ८४३५) धुळ्याकडे येत होते. मुंबई- आग्रा महामार्गावर पाटणे फाटा येथे गतिरोधक आहे. तेथे कारच्या पुढे चालत असलेल्या एक्‍सयूव्ही वाहनाच्या (एमएच १८, व्ही ८८) चालकाने ब्रेक दाबले. त्यामुळे दवे कुटुंबीयांची कार ‘एक्‍सयूव्ही’वर मागून आदळली. त्याचवेळी कारच्या मागून येत असलेल्या कंटेनरचीही कारला धडक बसली. यात प्राची, त्यांचा मुलगा शिवाय, बहीण रुची व चालक शफीक अहमद (रा. नाशिक) यांचा मृत्यू झाला. चालक व चिमुकला शिवाय जागीच ठार झाले होते. पती चिंतन दवे, त्यांची पत्नी व मेहुणी गंभीर जखमी होते. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्‍टरांनी प्राची व रुची यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जखमी चिंतन दवे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सटाणा नाका भागातील लोकमान्य हॉस्पिटलमधून तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सेसाठी नेण्यात आले. त्यावेळी चिमुकल्या शिवायचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक मदन गायकवाड, येथील गुरुदेव भक्तमंडळाचे कार्यकर्ते व शहरातील रंग व्यापारी मदतीला धावून आले. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात व दवे कुटुंबीयांच्या नातेवाइकांना दूरध्वनी करून चौकशी केली.

‘शिवाय’साठी चिंतनचा आक्रोश
या अपघातातून चिंतन दवे सुदैवाने बचावले. त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर जखमी अवस्थेत येथील सटाणा नाका भागातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आणले होते. दवे यांच्या हाताला मार लागला आहे. मात्र, पत्नी प्राची, मुलगा चिंतन व मेहुणी रुची यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेले जात होते. त्यावेळी चिमुरड्या शिवायला बाहेर काढताच चिंतन यांनी, ‘अरे मेरा बच्चू, मेरा शिवाय’ असा आवाज दिला. त्यावेळी त्यांच्यासह येथील उपस्थितांना हुंदके अनावर झाले होते.

आज अंत्यसंकार होणार
दवे कुटुंबीय धुळे येथील वल्लभनगरमध्ये राहतात. त्यांच्या बंगल्यासमोरच सासरे चंद्रकांत शहा हेही राहतात. चाळीसगाव क्रॉसिंगजवळ चंद्रकांत स्कूटर स्पेअरपार्टचे दुकान आहे. दवे कुटुंबीयांचा रंगाचा व्यवसाय आहे. मालेगाव रस्त्यावरील वल्लभनगरमध्ये रात्री उशिरा मृतदेह आणणार असून, उद्या (३० जून) सकाळी साडेनऊला अंत्ययात्रा निघेल.

पाटणे फाटा बनला ‘डेंजर स्पॉट’!
मालेगाव ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, तालुका पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, उपनिरीक्षक विलास चवळी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पाटणे फाटा येथे गतिरोधक असला, तरी मुंगसेहून वेगाने येणाऱ्यांना तो दिसत नाही. त्याच्याआधी रिफ्लेटरही नाही किंवा सूचनाफलकही नाही. त्यामुळे तो लवकर लक्षात येत नाही. जवळ आल्यानंतर गतिरोधक दिसतो अन्‌ अचानक वाहने थांबतात. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तेथे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. गतिरोधक झाल्यानंतरही अपघातांना आळा बसलेला नाही. त्यामुळे तेथे वाहनचालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com