'आधार' नसल्याने दोन वर्षांपासून 'निराधार'

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील वासखेडी (ता.साक्री) येथील रहिवासी व निराधार विधवा महिला केसरबाई श्रीराम पाटील (वय-67) या गेल्या दोन वर्षांपासून आधार कार्डच्या प्रतीक्षेत असून दोन वर्षांत तीन वेळा महा-ई सेवा केंद्रात आधार नोंदणी करूनही अद्याप त्यांना आधार कार्ड न मिळाल्याने 'सकाळ'कडे आपली व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते...

केसरबाई श्रीराम पाटील ह्या वयोवृद्ध निराधार विधवा महिला असून त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना मुलगा नसून केवळ एकच विवाहित मुलगी आहे. मुलगी आखाडे(ता.साक्री) येथे राहते. केसरबाई या अधूनमधून वासखेडी व आखाडे येथे मुलीकडे वास्तव्यास असतात. त्या राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थी असून अलीकडे बँकांनी बचत खाते आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक केल्यामुळे त्यांना खात्यावरून पैसे काढायला खूपच अडचण येत आहे. केसरबाई पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन वर्षांत किमान तीन वेळा आधार नोंदणी केली. प्रत्येक वेळी आधार कार्ड पोस्टामार्फत घरपोच मिळेल असे सांगण्यात आले. परंतु अखेरीस कंटाळून व वाट पाहून पाहून त्यांनी तीनदा आधार नोंदणी केली. तरी पण आजतागायत त्यांच्या घरच्या पत्त्यावर आधार कार्ड आलेले नाही.

यासंदर्भात जैताणेतील महा-ई सेवा केंद्र संचालकाशी संपर्क केला असता सदर महिलेने ऑगस्ट महिन्यात आधार नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. मात्र ऑनलाईन संगणक प्रणालीत पावतीवरील नोंदणी क्रमांक टाकल्यास चक्क 'रिजेक्ट' असा मेसेज येत असल्याने केसरबाई हतबल झाल्या आहेत. घरात कोणाचाही आधार नसल्याने आधार क्रमांकाअभावी केसरबाई अधिकच निराधार झाल्या आहेत. शेवटी वैतागून व मेटाकुटीला येऊन सदर विधवा वयोवृद्ध निराधार महिलेने 'सकाळ'कडे आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शासकीय यंत्रणेने त्यांना ताबडतोब न्याय मिळवून द्यावा. संबंधित बँकेनेही आधार क्रमांक मिळेपर्यंत त्यांची अडवणूक थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Dhule news aadhar card issue in jaitane