'काम करा नाहीतर नोकऱ्या सोडा': सीईओ डी. गंगाथरन

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 27 जुलै 2017

प्रामाणिकपणे काम करा नाहीतर नोकऱ्या सोडा अशी तंबी त्यांनी दिली. दिवसभरातून 300 लाभार्थ्यांची नोंदणी करा अन्यथा निलंबनाला सामोरे जा असा सज्जड दमही त्यांनी भरला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी धावपळ व सारवासारव करत उद्दिष्ट साध्य करण्याचे आश्वासन दिले.

निजामपूर : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे वयोश्री योजनेंतर्गत बीपीएल धारक ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य शारीरिक सहाय्यक यंत्रे व जीवनावश्यक सहाय्यक उपकरणे वाटपकरणेकामी तपासणी शिबिराचे आयोजन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांचेमार्फत करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन यांनी जैताणे आरोग्य केंद्रास भेट दिली. आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा पाहिजे तेवढा प्रचार व प्रसार न केल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनी सुरुवातीला चांगलेच धारेवर धरले. प्रामाणिकपणे काम करा नाहीतर नोकऱ्या सोडा अशी तंबी त्यांनी दिली. दिवसभरातून 300 लाभार्थ्यांची नोंदणी करा अन्यथा निलंबनाला सामोरे जा असा सज्जड दमही त्यांनी भरला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी धावपळ व सारवासारव करत उद्दिष्ट साध्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गंगाथरन यांचे सोबत गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, ग्रामविस्तार अधिकारी जे.पी.खाडे, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, डॉ.संजय मंडल, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.जी. वळवी, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील लांडगे, समाजकल्याण विभागाचे पी.यू. पाटील, "सीईओं"चे सहाय्यक श्री.पाटील, जैताणेचे ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, निजामपूरचे ग्रामविकास अधिकारी श्री. नवाणकर, दौलत जाधव, सुरेश सोनवणे आदी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Dhule news CEO warned employee