मारेकऱ्यांनी वापरलेली कार भुसावळमधून केली जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

धुळे - येथील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस दलाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री भुसावळ येथून आरोपी मारेकऱ्यांनी वापरलेली कार जप्त केली. या प्रकरणातील दोन मुख्य मारेकऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. 

धुळे - येथील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस दलाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री भुसावळ येथून आरोपी मारेकऱ्यांनी वापरलेली कार जप्त केली. या प्रकरणातील दोन मुख्य मारेकऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. 

शहरातील वर्दळीच्या पारोळा रोडवरील गोपाल टी हाउससह समोरील रस्त्यावर पंधरा साथीदारांसह सशस्त्र 12 मारेकऱ्यांनी 18 जुलैला सकाळी सव्वासहाच्या सुमारास गुंड गुड्ड्याची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा मारेकऱ्यांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक तथा तपासाधिकारी हिंमत जाधव यांनी बुधवारी (ता. 2) रात्री पथकासह भुसावळ, कंडारीसह परिसरात हा तपास केला. या परिसरातून पोलिस पथकाने अटकेतील छोटा पापा ऊर्फ विलास गोयर, राजेश देवरे ऊर्फ भद्रा, पारस घारू, सागर पवार ऊर्फ कट्टी यांनी हत्याकांडाच्या दिवशी घटनास्थळाजवळ येण्यासह फरार होण्यासाठी वापरलेली कार जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेली काही शस्त्रे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविली आहेत. 

अद्याप "तो' आदेश प्राप्त नाही 
गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडे तपास सोपविण्याची मागणी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, हा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपविण्याबाबत पोलिस महासंचालकांकडून अद्याप कुठलाही आदेश प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

Web Title: dhule news crime Bhusawal