दसेगाव शाळेबाबतच अहवाल द्यावा 

दीपक कच्छवा
रविवार, 25 मार्च 2018

दसेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेच, त्यामुळे दुसरा शिक्षक देण्याचा विषयच येत नाही. असलेल्या शिक्षकाची बदली झाली कशी यासह तसेच शाळेतील पटसंख्या व इतर अडीअडचणींचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवला आहे. 
- पोपट भोळे, सभापती शिक्षण समिती, जिल्हा परिषद, जळगाव

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : शंभर टक्के मागसवर्गीय विद्यार्थी असलेल्या दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षिकेला चार वर्गाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. या संदर्भात "सकाळ'मध्ये वस्तुनिष्ठ वृत्त झळकल्याने त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापती पोपट भोळे यांनी चौकशी करून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. 

दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील मागसवर्गीय विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग असून जवळपास 45 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला दोन वर्ग खोल्या असल्या तरी एका वर्षापासून योगिता राणे या प्रभारी मुख्याध्यापिकेलाच शिक्षक म्हणून कामकाज सांभाळावे लागत आहे.

यासंदर्भात "सकाळ'ने लक्ष वेधत 24 फेब्रुवारीच्या "टुडे' पानावर "एकच शिक्षिका सांभाळते चार वर्ग' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी शिक्षण विभागाच्या मासिक बैठकीत दसेगाव शाळेच्या शिक्षण सेवक बदलीची चौकशी करून शाळेचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा, असे तोंडी आदेश गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांना दिले आहेत. 

बदलीचे अधिकार कोणाला? 
दसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर 2015 ला शिक्षण सेवकाची नियुक्ती झाली होती. मात्र, संबंधित शिक्षण सेवक तामसवाडी शाळेवर तात्पुरत्या नियुक्तीवर सध्या आहेत. त्यामुळे या नियुक्ती संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या सभापतींनाही कुठलीच माहिती नाही. त्यामुळे कुठल्या आधारे संबंधित शिक्षण सेवकाची बदली झाली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, बदली झाली असेल तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण समितीपुढे तातडीने अहवाल सादर करावा, अशी सूचना आपण केली असल्याचे श्री. भोळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

"सकाळ'च्या वृत्तामुळे चौकशीचे आदेश 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी "सकाळ'च्याच वृत्ताची दखल घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून तातडीने अहवाल मागवला आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दसेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेच, त्यामुळे दुसरा शिक्षक देण्याचा विषयच येत नाही. असलेल्या शिक्षकाची बदली झाली कशी यासह तसेच शाळेतील पटसंख्या व इतर अडीअडचणींचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवला आहे. 
- पोपट भोळे, सभापती शिक्षण समिती, जिल्हा परिषद, जळगाव

Web Title: Dhule news dasegaon school