महामार्गालगत जलवाहिनीचा प्रस्ताव द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

धुळे - ‘अमृत’ योजनेंतर्गत प्रस्तावित अक्कलपाडा प्रकल्प ते हनुमान टेकडीदरम्यान जलवाहिनीच्या कामासाठी संबंधित सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशी आवाहनवजा अपेक्षा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज या विषयावर झालेल्या बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गालगत जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत केली.

शासनाच्या अमृत योजनेंतर्गत गुरुत्वाकर्षणावर आधारित अक्कलपाडा ते हनुमान टेकडीदरम्यान जलवाहिनीचा प्रस्ताव आहे. जलवाहिनीसाठी ८० कोटी, २५ ‘एमएलडी’ जलशुद्धीकरण केंद्रासाठी १२ कोटी व अंतर्गत जलवाहिनीच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असा एकूण १४२ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, सद्यःस्थितीत नागपूर- सुरत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने भूसंपादनासह इतर अनेक अडचणी असल्याने एकूणच कामाबाबत आयुक्त देशमुख यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून आज महापालिकेत चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. काळे, पाटबंधारेचे श्री. बडगुजर, महावितरणचे श्री. पावरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. भदाणे यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव, अभियंता कैलास शिंदे, प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते. योजनेचा अंतिम प्रस्ताव सादर करण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली.

प्रस्ताव द्या, तो वरिष्ठांना देऊ
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असल्याने या महामार्गालगत जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या वरिष्ठस्तरावर सादर केला जाईल असे प्राधिकरणाचे काळे यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. योजनेद्वारे शहरवासीयांसह विविध विभागांना पाण्याची सोय होणार असल्याने या योजनेसाठी संबंधित सर्व विभागांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आयुक्त देशमुख यांनी बैठकीत व्यक्त केली.

Web Title: dhule news dhule municipal corporation Water tank