डिसान ग्रुपच्या भागीदारांच्या निवासस्थानी छापे 

डिसान ग्रुपच्या भागीदारांच्या निवासस्थानी छापे 

धुळे - "डिसान' ग्रुपच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी शिक्षणमंत्री, शिरपूरचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धुळ्यातील नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि उर्वरित सहा जणांच्या शिरपूर, धुळे येथील निवासस्थानी आज सकाळी आठला नाशिक, मुंबई येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापा टाकला. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली. 

पथकांनी तपासणीवेळी संबंधितांच्या निवासस्थानांमधील कुठल्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास आणि बाहेरील कुठल्याही व्यक्तीला आत प्रवेशासाठी मज्जाव केला. निवासस्थानांमधील संबंधित व्यक्तींचे मोबाईल ताब्यात घेतले. या प्रकारामुळे जिल्ह्यासह सर्वत्र राजकीय वातावरण ढवळून निघत असताना उलटसुलट चर्चांनाही उधाण आले. सकाळी आठला सुरू झालेल्या चौकशीसह कागदपत्रांची तपासणी रात्री नऊनंतर सुरूच होती. 

450 जणांचे जम्बो पथक 
प्राप्तिकर विभागाच्या पथकातील तब्बल साडेचारशे अधिकारी, कर्मचारी हे 70 वाहनांच्या ताफ्यासह शिरपूर आणि धुळे येथे रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. शिरपूर येथे पथकातील अडीचशे कर्मचारी, तर उर्वरित धुळे येथे संबंधित नेते, समर्थक पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चौकशीसह कागदपत्रांची तपासणी करीत होते. 

प्राप्तिकर विभागाचे छापे का? 
धुळे शहरालगत "एमआयडीसी'त मुख्य कार्यालय असलेल्या डिसान ऍग्रो- टेक लिमिटेड कंपनीशी निगडित डिसान ग्रुप आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करण्यात हा उद्योग समूह राज्यात आघाडीवर आहे. तसेच विस्तारात तेल, ढेप, कोल्डस्टोअरेज, कापड व टीशर्ट, टॉवेल निर्मितीसह विविध प्रकारची निर्यातक्षम उत्पादने हा समूह घेतो. या ग्रुपचे आमदार पटेल, माजी आमदार कदमबांडे निरनिराळ्या कंपन्यांचे भागीदार आहेत. या ग्रुपच्या कंपनीचे सांताक्रूझ (मुंबई) येथे कॉर्पोरेट ऑफिस आहे. तेथे कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची सहा दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने तपासणी केली. त्यात सोयाबीन खरेदी किंवा कंपन्यांच्या ताळेबंदमधील व्यवहाराची मांडणी सुसंगत न वाटल्याच्या कारणावरून प्राप्तिकर विभागाने हे छापे घातल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

एकूण आठ जणांची चौकशी 
प्राप्तिकर विभागाने डिसान ग्रुपशी निगडित शिरपूर व धुळे येथील कंपन्या, त्यातील भागीदार आमदार पटेल, माजी आमदार कदमबांडे, तसेच शिरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, अशोक कलाल, व्यापारी बबन अग्रवाल, सनदी लेखापाल विजय राठी, ऍड. सी. बी. अग्रवाल आदींच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली. मात्र, प्राप्तिकर विभागाचे छापासत्र व चौकशीसह कागदपत्र तपासणीतील वस्तुस्थितीदर्शक माहिती रात्री उशिरापर्यंत समोर येऊ शकली नाही. आमदार पटेल यांच्या शिरपूरमधील "जनक व्हिला' या निवासस्थानी तपासणी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा होता. माजी आमदार कदमबांडे यांच्या धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड परिसरातील निवासस्थानाजवळ काही काळ समर्थकांनी गर्दी केली होती. चौकशी, कागदपत्रांच्या तपासणीवेळी श्री. कदमबांडे हे कुटुंबातील सदस्यांसह घरात अडकून होते. 

शिरपूरला मोठे छापासत्र 
शिरपूर- चोपडा रस्त्यावर तांडे शिवारातील टेक्‍स्टाईल पार्कमधील डिसान ग्रुपच्या कंपन्यांची प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी कसून चौकशी सुरू केली. यात आदेश, रुबी कोटेक्‍स, तथ्या, प्रमुख, द्वेता, परम टेक्‍स, प्रियदर्शिनी सूतगिरणी, कृष्णा कॉटेक्‍स, डिसान, योगी आदी कंपन्यांची कार्यालये सकाळी आठपासून एकाच वेळी ताब्यात घेण्यात आली. कामगारांना आपली कामे करण्यास सांगण्यात आले. या कंपन्यांमधील संगणक मात्र प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाताळले. दिवसभरात 2015 पासून असलेल्या संगणकीय नोंदी तपासण्यात येत होत्या. "शिफ्ट' संपल्यावर बाहेर पडणाऱ्या कामगारांची झडती घेऊन बाहेर सोडले जात होते. प्रत्येक कंपनीबाहेर प्राप्तिकर विभागाची दोन वाहने उभी होती. शिरपूर कन्स्ट्रक्‍शन, पीपल्स बॅंक, प्रियदर्शिनी पतसंस्था आदी कार्यालयातही चौकशी झाली. डिसान ग्रुपशी निगडित शिरपूर शहरातील व्यक्तींच्या निवासस्थानी जात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत संबंधित अधिकारी ठाण मांडून होते. तशीच स्थिती माजी आमदार कदमबांडे यांच्या निवासस्थानी होती. यात राजकीय सुडातून हा प्रकार घडल्याबाबत उलटसुलट चर्चा लपून राहिली नाही. 

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये आवश्‍यक त्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. नियमित तपासणीचाही एक भाग म्हणून कागदपत्रे ते पाहात आहेत. शिरपूर येथेच असून, या विभागाला अपेक्षित सहकार्य करीत आहे. 
- अमरिशभाई पटेल, आमदार, कॉंग्रेस, शिरपूर 

डिसान ग्रुपच्या कोल्ड स्टोअरेज, परम कंपनीत भागीदार आहे. त्यामुळे कागदोपत्री व्यवहारांची नियमित तपासणी प्राप्तिकर विभाग करीत आहे. त्यांना आवश्‍यक ते सहकार्य करत आहे. 
- राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, धुळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com