जैताणे ग्रामीण रुग्णालयास कुणी डॉक्टर देता का डॉक्टर?

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 25 जुलै 2017

जागेचा वाद...
जैताणे येथील गावठाण गट क्रमांक 92 मधील रुग्णालयाची जागा ही न्यायप्रविष्ट असल्याने आरोग्य विभाग इमारतीसह येथील कोणत्याही पायाभूत सुविधांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास इच्छुक दिसून येत नाही. जोपर्यंत जागेचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहील. जैताणे ग्रामपंचायतीसह शासनाने जनहिताची खास बाब म्हणून केवळ रुग्णालयाच्या जागेपुरती स्थगिती उठविण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यास हा प्रश्न मार्गी लागेल.

निजामपूर : माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रास "कुणी डॉक्टर देता का डॉक्टर" असे म्हणण्याची वेळ निजामपूर-जैताणे व माळमाथा परिसरातील जनतेवर आली आहे. येत्या शनिवारपर्यंत डॉक्टरांची नेमणूक न केल्यास रुग्णालयास टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य शानाभाऊ बच्छाव, नवल खैरनार, ईश्वर न्याहळदे, राजेश बागुल, अजित बागुल, किरण महाजन, दौलत जाधव, प्रकाश गवळे, अल्ताफ कुरेशी, तौफिक शेख आदींनी दिला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन व ग्रामीण रुग्णालयाचे चार असे किमान सहा डॉक्टर आवश्यक असताना याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ डॉ. जी. जी. वळवी हे एकच पूर्णवेळ डॉक्टर कार्यरत आहेत. तर ग्रामीण रुग्णालयात केवळ डॉ. चित्तम ह्या एकच वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. ते पण पूर्णवेळ रुग्णालयात थांबत नाही. सद्या ते प्रतिनियुक्तीवर धुळे येथे कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयातर्फे दररोज नवनवीन डॉक्टर दोन तास सेवा पुरवितात. त्यामुळे रुग्ण व कर्मचारी चांगलेच संभ्रमात पडतात. त्यांची वेळ सकाळी 9 ते 12 अशी ठरवून दिली असतानाही ते दहा साडेदहाला येतात. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात. योगायोगाने एकाच वेळेस दोन डॉक्टर उपलब्ध झालेच तर एकच कन्सलटिंग रूम असल्याने एका डॉक्टरास चक्क बाहेर उघड्यावरच रुग्णतपासणी करावी लागते. सद्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांनी एकत्र चूल मांडली आहे. आरोग्य केंद्राची इमारत व निवासस्थानांही प्रचंड दुरावस्था झाली आहे. इमारत प्राथमिक आरोग्य केंद्राची असून ग्रामीण रुग्णालय केवळ कागदावर आणि नावापुरतेच आहे. सर्व साधनसामुग्री आणि औषधे प्राथमिक आरोग्य केंद्राची आहेत. ग्रामीण रुग्णालयाकडून कोणतीही औषध-सामग्री पुरविली जात नाही.

ग्रामीण रुग्णालयात आजमितीला केवळ दोन परिचारिका आणि एक शिपाई एवढे तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित सर्व सर्व स्टाफ प्रतिनियुक्तीवर आहे. फार्मासिस्टची जागाही रिक्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एक परिचर, एक स्वीपर, दोन शिपाई अशी चार पदे रिक्त आहेत. 108 रुग्णवाहिकेचीही सोय नाही. सद्या रुग्णालयात "स्नेक-बाईट" अर्थात सर्पदंशावर कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. अनेकदा तक्रारी करूनही रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळत नाही. सद्या येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल आकडे यांची शिरपूर येथे बदली झाल्याने रुग्णांची जास्तच गैरसोय झाली आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा येथे बदली करावी अशी काही ग्रामस्थांची मागणी आहे.

जागेचा वाद...
जैताणे येथील गावठाण गट क्रमांक 92 मधील रुग्णालयाची जागा ही न्यायप्रविष्ट असल्याने आरोग्य विभाग इमारतीसह येथील कोणत्याही पायाभूत सुविधांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास इच्छुक दिसून येत नाही. जोपर्यंत जागेचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहील. जैताणे ग्रामपंचायतीसह शासनाने जनहिताची खास बाब म्हणून केवळ रुग्णालयाच्या जागेपुरती स्थगिती उठविण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यास हा प्रश्न मार्गी लागेल. यापूर्वी निजामपूर पोलीस ठाण्यास अशी इमारत बांधकामाची परवानगी देण्यात आली आहे. मग रुग्णालयास का अडविण्यात येते असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रामदास भदाणे यांनी वेळोवेळी उपस्थित केला आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य इंदूबाई खैरनार, पंचायत समिती सदस्या सुनीता बच्छाव, सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे आदींनी याबाबत पाठपुरावा केला आहे. पण सद्या स्थानिक प्रशासनही हतबल झाले आहे.

माळमाथा परिसरातील जनतेच्या एवढया मोठ्या जिव्हाळ्याच्या आणि आरोग्याच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, तालुक्याचे आमदार डी.एस.अहिरे, खासदार डॉ. हीना गावीत हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित बागुल, किरण महाजन यांनी "दैनिक सकाळ"शी बोलताना केला.

Web Title: Dhule news doctor issue in jaitane