'त्या' नराधमावर कठोर कारवाई करा; पोलिसांत महिलांचे निवेदन

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 9 मार्च 2018

"वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव येऊ नये म्हणून   ह्या विशेष पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे."
- दिलीप खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, निजामपूर-जैताणे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील पीडित अल्पवयीन मुलीला न्याय देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा करावी. आरोपीस सहकार्य करणाऱ्या व गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहआरोपींवरही कडक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी निजामपूर-जैताणे येथील काही महिला व तनिष्का भगिनींनी निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या आठ फेब्रुवारीला दोंडाईचा येथील पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका पस्तीस वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. त्याचे पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. त्यासंदर्भात विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलने व मोर्चे काढून प्रशासनाला निवेदनेही दिली आहेत. नुकतीच मुख्य आरोपीसह काही सहआरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. परंतु तपासात कोणतीही कसर राहू नये म्हणून "प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे," असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यासंदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक, पथकप्रमुख विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष पोलिस तपास पथकात (एसआयटी) आठ पोलिस अधिकाऱ्यांसह निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनी हे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर तनिष्का समन्वयिका तथा 'अंनिस'च्या महिला सहभाग कार्यवाह मोहिनी जाधव, वर्षा वानखेडे, अर्चना वानखेडे, सुनीता चव्हाण, गौरी कासार आदींच्या सह्या आहेत. यावेळी निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील, महिला पोलिस कर्मचारी आशा चव्हाण, सुभद्रा सोनवणे, अस्मिता गायकवाड, हवालदार कांतीलाल अहिरे आदी उपस्थित होते.

Web Title: dhule news dondai child rape crime police women