जैताणेत संसारोपयोगी साहित्यासह झोपडी जळून खाक

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

या आगीत आगपीडितांनी घर बांधणीसाठी जमवलेले बॅगेतील 65 हजार रुपये रोकडसह तीन पत्र्याच्या कोठ्या व त्यातील संसारोपयोगी साहित्य, एक पोते बाजरी, 50 किलो गहू व 20 किलो तांदूळ धान्य आदी खाक झाले. जैताणेचे तलाठी श्री. रोजेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील वासखेडी रोडलगत बीएसएनएल ऑफिसजवळ राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला आज दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीत 65 हजार रुपये रोकड व संसारोपयोगी साहित्यासह सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. या अग्निउपद्रवामुळे मात्र मोलमजुरी करून पोट भरणारे एक सर्वसामान्य गरीब कुटुंब उघड्यावर पडले आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दीपक आनंदा इंदवे (वय-23) व्यवसाय- शिक्षण याने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एकच्या सुमारास खबर देणाराची आजी हिरुबाई वामन पवार (वय-75) ह्या चुलीवर चहा करीत असताना जवळील लाकडांनी पेट घेतला व त्यामुळे झोपडीलाही आग लागली. कामानिमित्त गावात गेलेल्या दिपकला ही माहिती मोबाइलद्वारा त्याचा मित्र ज्ञानेश्वर सोनवणे याने दिली. त्यांनतर दिपकसह आजूबाजूच्या लोकांनी मिळून ताबडतोब ही आग आटोक्यात आणली.

या आगीत आगपीडितांनी घर बांधणीसाठी जमवलेले बॅगेतील 65 हजार रुपये रोकडसह तीन पत्र्याच्या कोठ्या व त्यातील संसारोपयोगी साहित्य, एक पोते बाजरी, 50 किलो गहू व 20 किलो तांदूळ धान्य आदी खाक झाले. जैताणेचे तलाठी श्री. रोजेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनीही प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. दीपक इंदवे याने दिलेल्या माहितीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश शिरसाठ घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Dhule news fire in Jaitane