धुळेः गोंधळामुळे सोनगीर ग्रामसभा तहकूब

एल. बी. चौधरी
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच धनंजय कासार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावाचा मुख्य पाणीप्रश्न, स्वच्छता, अतिक्रमण आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच झाली नाही. ग्रामसभेला जमलेल्यांपैकी काही जण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतात इतर मात्र केवळ गोंधळ घालतात. आपणच निवडून दिलेल्या सरपंच व सदस्यांना दुरुत्तरे देतात यावरुन लोकांना देखील विशिष्ट शिस्त व आचारसंहिता लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामसभेसह सदस्यांची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे.

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच धनंजय कासार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावाचा मुख्य पाणीप्रश्न, स्वच्छता, अतिक्रमण आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच झाली नाही. ग्रामसभेला जमलेल्यांपैकी काही जण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतात इतर मात्र केवळ गोंधळ घालतात. आपणच निवडून दिलेल्या सरपंच व सदस्यांना दुरुत्तरे देतात यावरुन लोकांना देखील विशिष्ट शिस्त व आचारसंहिता लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामसभेसह सदस्यांची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामसभा हे तंटा निर्मितीचे ठिकाण होण्याचा धोका आहे. जनतेला ग्रामसभेचे महत्त्व पटवून देणारे प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे.

येथील ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या एका विविधोपयोगी सभागृहात होते. हे सभागृह लहान असल्याने अनेकांना बसायला जागा मिळत नाही. तेथून गोंधळाला सुरवात होते. काल तेच झाले. उपसरपंच धनंजय कासार यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. मागील इतिवृत्तातील नोंदींची अंमलबजावणी झाली नाहीत. तसेच घरकूल यादीत फेरफार करून मंजूर करण्यात आले. ग्रामरोजगार सेवकाचेे निलंबन आदी विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जागा व घरकूल घेण्यासाठी पात्र कुुटुंबांना 50 हजार रुपये मदत मिळेल. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या बेरोजगारांना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाणे यांनी केले. ग्रामपंचायतीचे उत्पन्न किती? खर्च किती? प्रत्येक व्यवहार जीएसटी लावून धनादेशाद्वारे व्हावे असे सुचविण्यात आले. दरम्यान एक विषय पूर्ण होण्यापूर्वीच दुसरा विषय पुढे येत असल्याने व प्रत्येक जण आपलाच विषय दामटण्याचा प्रयत्न करत असल्याने उपसरपंच कासार व एकाची बाचाबाची झाली. त्यातच गोंधळ वाढल्याने ग्रामसभा तहकूब झाल्याचे उपसरपंचांनी जाहीर केले. अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. मंचावर उपसरपंच कासार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, किशोर पावनकर, राजूलाल भील, ग्रामविकास अधिकारी बैसाणे उपस्थित होते. जागा नसल्याने सभागृहाबाहेर पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, ग्रामपंचायत सदस्य प्रेमल पाटील, गुड्डू सोनार, पराग देशमुख, चंद्रशेखर परदेशी, संदीप गुजर, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, माजी सरपंच किशोर शुक्ल आदी उपस्थित होते. त्यामुळे बाहेरही विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेत संजय पाटील, दिनेश देवरे, जयराम धोबी, मनोहर धनगर, सुरेश भील आदींनी सहभाग घेतला.

ग्रामसभेचे महत्त्व -
ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग असावा व चर्चेतून विकासकामांना चालना मिळावी, नवनवीन कल्पना, उपक्रमांची माहिती व्हावी, शासनाचे नवीन परिपत्रक, धोरणे जनतेपर्यंत पोहचावी, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ग्रामसभेला अत्यंत महत्व आहे. मात्र, ग्रामसभेचे महत्त्व समजून घेतले जात नाही. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत उपस्थित काही तरुण व्यवस्थित प्रश्न व सदस्यांनी दिलेली उत्तरे ऐकून न घेता आरडाओरड करुन अथवा जोरजोरात हसून गोंधळ घालत होते. त्यामुळे ग्रामसभेत येणाऱ्या प्रामाणिक जनतेला हा पोरखेळ पाहून दु:ख झाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: dhule news gram sabha cancel in songir village