‘अपंग कल्याण’साठी संनियंत्रण समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

धुळे - महापालिकेच्या अंदाजपत्रकात राखीव अपंग कल्याण निधीची तरतूद होते मात्र, खर्च होत नसल्याची स्थिती समोर आल्यानंतर आयुक्त देशमुख यांनी याची तत्काळ दखल घेत संनियंत्रण समिती गठित केली असून या समितीने योजना तयार करावी, असा आदेश दिला आहे. समितीने १० ऑगस्टपूर्वी बैठक घेण्याचेही निर्देश दिले आहेत.

धुळे - महापालिकेच्या अंदाजपत्रकात राखीव अपंग कल्याण निधीची तरतूद होते मात्र, खर्च होत नसल्याची स्थिती समोर आल्यानंतर आयुक्त देशमुख यांनी याची तत्काळ दखल घेत संनियंत्रण समिती गठित केली असून या समितीने योजना तयार करावी, असा आदेश दिला आहे. समितीने १० ऑगस्टपूर्वी बैठक घेण्याचेही निर्देश दिले आहेत.

अपंग व्यक्तींसाठी अंदाजपत्रकाच्या तीन टक्के राखीव निधीची तरतूद करून तो लाभार्थ्यांवर खर्च करणे आवश्‍यक असताना महापालिका याबाबत उदासीन असल्याचे चित्र माध्यमांनी समोर आणले.‘तरतूद ३५ लाख, खर्च फक्त २० हजार’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’नेही हा विषय मांडला. याची तत्काळ दखल घेत आयुक्त देशमुख यांनी संनियंत्रण समिती गठित केली आहे.

अपंग कल्याण या विषयासाठी आजअखेर कोणत्याही खात्यावर सुस्पष्ट जबाबदारी सोपविलेली दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेत अपंग कल्याण विभाग निर्माण करून कार्यरत प्रकल्प अधिकारी गणेश खोंडे यांची अपंग कल्याण विभागासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

योजना तयार करा
सनियंत्रण समितीने ३१ ऑगस्टपूर्वी अन्य महापालिकेत सुरू असलेल्या योजनांचा अभ्यास करून धुळे शहरासाठी योग्य योजना तयार करून ती सादर करावी. सक्षम प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर समिती योजना अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवेल. दर १५ दिवसांनी बैठका घेऊन अपंगांच्या योजना अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकाऱ्यामार्फत योग्य त्या उपाययोजना करेल. खर्चास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता आवश्‍यक राहील. समितीने आपली पहिली बैठक १० ऑगस्ट २०१७ पूर्वी घ्यावी व त्यापुढेही वेळच्यावेळी नियोजन करावे. अपंगासाठी राखीव निधी विनियोजन योग्यरीत्या करण्याची जबाबदारी समिती व प्रकल्प अधिकाऱ्यांची राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

समिती अशी
अध्यक्ष- उपायुक्त (कर), सदस्य सचिव- प्रकल्प अधिकारी, सदस्य-  सहाय्यक आयुक्त (प्रकल्प विभाग), सहाय्यक आयुक्त (आरोग्य  विभाग), आरोग्याधिकारी, प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ), अपंग समावेशित शिक्षण समन्वयक.

प्रशासनाकडून कबुली
दरवर्षी अंदाजपत्रकात अपंगांसाठी खर्चाची तरतूद केली जाते. महापालिकेमार्फत शाळा व कार्यालयात अपंगांसाठी काही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मात्र, यापूर्वी अंदाजपत्रकानुसार खर्च केल्याचे दिसून येत नसल्याचे प्रशासनानेच कबूल केले आहे. तसा उल्लेख आयुक्तांच्या आदेशात दिसून येतो.

Web Title: dhule news handicap