धुळेः जैताणे सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची झुंबड; ग्राहकांचे प्रचंड हाल
धुळेः जैताणे सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची झुंबड; ग्राहकांचे प्रचंड हाल

धुळेः जैताणे सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची झुंबड; ग्राहकांचे प्रचंड हाल

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेचे व्यवहार गेल्या दहा दिवसांपासून इंटरनेट सुविधेअभावी ठप्प झाले होते. त्यामुळे सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची झुंबड उडाली असून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातून धक्काबुक्की व शाब्दिक चकमकी नित्याचीच बाब झाली आहे.

दुसाणे येथे स्वतंत्र शाखेची गरज...
गर्दीमुळे व पुरेशा नियोजनाअभावी माळमाथा परिसरातील 27 गावांच्या ग्राहकांचे या शाखेत कायमच हाल होतात. शासन व बँक प्रशासनाने दुसाणे येथे स्वतंत्र शाखा सुरु करुन 27 पैकी किमान दहा-बारा गावे त्या शाखेला जोडल्यास कर्मचाऱ्यांवरचा ताणही कमी होण्यास मदत होईल. व सर्व ग्राहकांनाही तत्पर सुविधा मिळेल.

कर्मचाऱ्यांची अरेरावी...
या शाखेत नियुक्त बहुतेक शाखाधिकारी हे परप्रांतीय असल्याने त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ते हिंदी भाषेतून ग्रामीण भागातील ग्राहकांशी संवाद साधत असल्याने ग्राहकांच्या समस्या सोडवताना प्रचंड अडचणी येतात. कर्मचारीही अरेरावीची भाषा वापरतात. त्यावर कुठेतरी अंकुश ठेवण्याची गरज आहे.

अपूर्ण कर्मचारी वर्ग...
या शाखेला परिसरातील 27 गावे जोडली आहेत. त्यामुळे शाखेत किमान 6 ते 7 कर्मचाऱ्यांची गरज असताना येथे केवळ एक शाखाधिकारी, दोन कर्मचारी व एक शिपाई असे चारच कर्मचारी कार्यरत असून कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण पडतो व ग्राहकांची कामेही खोळंबतात. म्हणून या शाखेत पुरेसा कर्मचारी वर्ग नेमण्याचीही आवश्यकता आहे.

खाजगी एजंटांचा सुळसुळाट...
या ठिकाणी काही खाजगी एजंटही ग्राहकांची लूट करतात. असा आरोप ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलताना केला आहे. खाजगी एजंटांचा अर्थपूर्ण संबंध थेट कर्मचाऱ्यांशी असल्याने मागच्या दरवाज्यातूनही काही कामे केली जातात असा आरोपही ग्राहकांनी यावेळी केला.

सदोष काऊंटर सुविधा...
या शाखेतील काऊंटर सुविधाही सदोष असून प्रवेशद्वारासमोरच कॅश काऊंटर असल्याने गर्दीमुळे महिलांना धक्काबुक्की होते. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र काऊंटर असणे गरजेचे आहे. शाखेला किमान दोन प्रवेशद्वारे असणेही आवश्यक आहे. उंच पायऱ्या असल्याने गर्दीमुळे एखाद्या वेळेस दुर्घटनाही घडू शकते.

शेतकऱ्यांसह महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचीही गैरसोय...
याठिकाणी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत खाती असलेल्या निराधार, विधवा व वृद्ध महिलांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. या गर्दीमुळे त्यांचा जीवही अक्षरशः मेटाकुटीला येतो. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनाही रांगेत तासनतास ताटकळत उभे रहावे लागते. तरीही काम होईलच याची खात्री नसते. मधेच अचानक कॅशही संपते. तेव्हा मात्र ग्राहकांची जीवावर येते.

अस्थिर इंटरनेटसुविधा...
या शाखेत 19 ऑगस्टपासून सलग दहा दिवस इंटरनेटसुविधा बंद होती. त्यांनतरही अधूनमधून ही समस्या उदभवते. त्यामुळेही ग्राहक प्रचंड हैराण होतात. यासंदर्भात बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ही 'बीएसएनएल'ची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचारी वर्ग वाढवून मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक विभागीय कार्यालयाशी याबाबत त्यांनी दूरध्वनीद्वारे केवळ तोंडी पाठपुरावा करण्यापेक्षा लेखी व कागदोपत्री पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच 'ऑनलाइन' सोबतच 'ऑफलाईन' सुविधाही पुरविणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com