जैताणे आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना प्राथमिक शिक्षकाकडून दमदाटी

health centre
health centre

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना नुकतेच शवविच्छेदनाच्या कारणावरून येथीलच 'एका' प्राथमिक शिक्षकाने अपशब्द वापरून शिवीगाळ केली. दमदाटी करत रुग्णालयातील खुर्चीचीही तोडफोड केली. त्यामुळे व्यथित झालेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणलेबाबत व जीवितास धोका असलेबाबतच्या लेखी तक्रार अर्जासह हे प्रकरण थेट निजामपूर पोलीस स्टेशनपर्यंत नेले. परंतु या प्रकरणात थेट जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर काही स्थानिक पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण आपापसांत मिटविले.

'संबंधित' प्राथमिक शिक्षकाने गयावया करत आरोग्य कर्मचाऱ्यांची माफी मागितली व पुन्हा असा प्रकार घडणार नाही असे आश्वासन दिले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे तेवढ्यावरच समाधान झाले नाही. त्यांनी 'सदर' शिक्षकाने लेखी माफी मागावी असा आग्रह धरला. शेवटी घटनेचे गांभीर्य ओळखून 'संबंधित' शिक्षक लेखी माफी मागण्यास तयार झाला अन वादावर पडदा पडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनीही 'नेतेगिरी' व 'चमकोगिरी' करणाऱ्या 'सदर' प्राथमिक शिक्षकास तंबी देऊन पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला...

पोलीस पंचनाम्यासह अन्य कायदेशीर कागदोपत्री सोपस्कार पार पडल्याशिवाय आम्ही थेट शवविच्छेदन करू शकत नाही. मृताच्या नातलगांच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु ग्रामस्थांनीही संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणीही येऊन उतावीळपणे थेट दमदाटीची भाषा करणे योग्य नाही.
- डॉ. गोपीन वळवी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जैताणे ता. साक्री जि. धुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com