जैताणे (ता. साक्री) : ग्रामीण रुग्णालयासाठी खारीखाणमधील गावठाणच्या पर्यायी जागेची पाहणी करताना सरपंच संजय खैरनार, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र कोठावदे आदी. (छायाचित्र : प्रा.भगवान जगदाळे)
जैताणे (ता. साक्री) : ग्रामीण रुग्णालयासाठी खारीखाणमधील गावठाणच्या पर्यायी जागेची पाहणी करताना सरपंच संजय खैरनार, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र कोठावदे आदी. (छायाचित्र : प्रा.भगवान जगदाळे)

जैताणे ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग साडेनऊ वर्षांनी झाला मोकळा

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून २००८ मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचा मार्ग तब्बल नऊ वर्षे आठ महिन्यांनी मोकळा झाल्याने जैताणे-निजामपूरसह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

न्यायालयीन स्थगितीमुळे विलंब...
केवळ गट क्रमांक ९२ मधील न्यायप्रविष्ट जागेमुळे गेल्या साडेनऊ वर्षांपासून हे ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे पडून होते. अखेर २६ जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत पर्यायी जागेचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र कोठावदे सूचक होते. तर ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार अनुमोदक होते. २ फेब्रुवारीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह खारीखाणमधील जैताणे गावठाणची गट क्रमांक ६५४/१ च्या पर्यायी पाच एकर जागेची पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ निर्विवाद जागेअभावी पडून आहे.

लोकप्रतिनिधींचे सहकार्य...
सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात 'सकाळ'कडे आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत माजी मंत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डी. एस. अहिरे, आमदार अमरिशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते आदींनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

परिसरातील लाखो रुग्णांना लाभ...
जैताणे ग्रामीण रुग्णालयामुळे माळमाथा परिसरातील जैताणे, दुसाणे, छडवेल, नवापाडा आदी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ७२ खेड्यातील लाखो गोरगरिबांना याचा लाभ होणार आहे. अजूनही अपुऱ्या वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांना पुढील उपचारासाठी साक्री, धुळे, नंदुरबार याठिकाणी घेऊन जावे लागते. त्यामुळे अनेकदा रस्त्यातच रुग्ण दगावल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.

३० खाटा व २५ कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा मंजूर...
ग्रामीण रुग्णालयासाठी किमान ३० खाटा व २५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा मंजूर असून त्यात वैद्यकीय अधिक्षकांसह तज्ञ शल्यचिकित्सक, भुलतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी किमान चार तज्ञ डॉक्टरांसह नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. एक्स-रे, रक्त, लघवी, थुंकी तपासणी आदी सुविधा उपलब्ध होतील. कुपोषित बालकांवर उपचार, कुटुंबनियोजन, नसबंदी शस्त्रक्रिया, सिझेरियन, एचआयव्ही टेस्ट, विषबाधा व सर्पदंश, अपघात, क्षयरोग आदींबाबत सुविधा व उपाययोजना उपलब्ध होतील. रुग्णकल्याण समितीमार्फत रुग्णालयात जमा होणारा निधी रुग्णांच्या कल्याणासाठी तिथेच खर्ची टाकता येईल.

पर्यायी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर...
खारीखाणमधील जैताणे गावठाणच्या अठरा एकरपैकी पाच एकर जागेचा ग्रामपंचायतीचा ठराव दोन फेब्रुवारीला वैद्यकीय अधिक्षकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी ताबडतोब जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत संबंधित ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने दाखल केला असून आरोग्य विभागाने श्री. चव्हाण नामक कर्मचाऱ्याकडे कागदोपत्री पाठपुरावा करण्याचे काम सोपविले आहे. येत्या नऊ फेब्रुवारीला मंत्रालयात ग्रामीण रुग्णालयाबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आल्याचे समजते.

जनहितासाठी कागदोपत्री सोपस्कार कमी करावेत...
अनेकदा जनहिताची कामे ही कागदोपत्री सोपस्कारात अडकून पडतात. जमीन अधिग्रहण करताना विविध विभागांकडून नाहरकतीचे दाखले मिळवावे लागतात. त्याकामी अडवणूक होणार नाही. याची काळजी शासनाने घेणे गरजेचे आहे. अशावेळी ग्रामस्थांनीही जातीपातीचे, गटातटाचे संकुचित राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असते. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

गावापासून हाकेच्या अंतरावर...
ग्रामीण रुग्णालयासाठीची खारीखाणमधील ही पर्यायी जागा निजामपूर-जैताणेपासून लामकानी, दोंडाईचा रोडवरील हाकेच्या अंतरावर आहे. सरवड-कोंडाईबारी राज्य महामार्ग मंजूर झाल्यामुळे भविष्यात धुळे येथे जाताना नागरिकांचा वेळही वाचणार आहे. निजामपूरच्या स्मशानभूमीसाठी जैताणे ग्रामपंचायतीने यापूर्वीच १ एकर जागा दिली असून ती जागा वगळता लगतची उर्वरित जागा ग्रामीण रुग्णालयासाठी दिली जाणार आहे. निजामपूर ग्रामपंचायतीनेही जैताणे ग्रामपंचायतीतर्फे स्मशानभूमीसाठी देण्यात आलेल्या १ एकर जागेपेक्षा जास्त जागा ताब्यात घेऊ नये, असे आवाहनही सरपंच संजय खैरनार यांनी केले आहे.

ग्रामपंचायत सदस्यांचा पाठपुरावा...
सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, माजी उपरपंच व ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पगारे, ईश्वर न्याहळदे, शानाभाऊ बच्छाव, नवल खैरनार, गणेश देवरे, दादा भिल, प्रमिलाबाई जाधव, मनीषा बागुल, छाया कोठावदे, रेवाबाई न्याहळदे, सुरेखा बोरसे, इंदूबाई खलाणे, पुष्पाबाई गवळे, आशा सोनवणे, सुरेखा भिल आदी सर्व सतरा सदस्यांसह ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे, सामाजिक कार्यकर्ते दौलत जाधव, राजेश बागुल, परशराम खलाणे, प्रकाश गवळे, भिका न्याहळदे, युवराज बोरसे, सुरेश सोनवणे, प्रमोद कोठावदे, भालचंद्र कोठावदे, आबा भिल आदी प्रयत्नशील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com