कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे'बेमुदत उपोषण आंदोलन' स्थगित

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 20 मार्च 2018

21 मार्चला पुन्हा बैठक, बैठकीतील अंतिम निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू : प्रा. अनिल देशमुख.!

21 मार्चला पुन्हा बैठक, बैठकीतील अंतिम निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू : प्रा. अनिल देशमुख.!

निजामपूर-जैताणे (धुळे) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले. त्यानंतर 13 मार्चला विधानभवनात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली. तेव्हा ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता.19) पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक झाली. तीत शिक्षकांच्या काही प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने येत्या २१ मार्चपासून संघटनेने पुकारलेले बेमुदत उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली आहे.

२१ मार्चला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पुन्हा संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांनी संघटनेला दिले आहे. त्या बैठकीतील निर्णयानंतर पुढील आंदोलनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील आदींनी दिली आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीत उर्वरित कायम विनाअनुदानित मूल्यांकनपात्र कनिष्ठ महाविद्यालयांची पुढील यादी तातडीने जाहीर करणे व 2 मे 2012 नंतर नियुक्त परंतु नाहरकत नसलेल्या उर्वरित शिक्षकांनाही मान्यता देणे, या दोन्ही मागण्यांबाबत स्वतंत्र आदेश काढण्याचे मान्य करण्यात आल्याने आगामी २१ मार्चपासूनचे बेमुदत उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. २१ मार्चच्या बैठकीतील निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: dhule news junior college professor strike and vinod tawde