धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर वर्चस्वाची रस्सीखेच

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 30 जून 2017

धुळे जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दोन पारंपारिक गट विरोधात लढत असतात. विशेष म्हणजे दोन्ही गट काँग्रेसमधीलच आहेत.

धुळे : धुळे जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दोन पारंपारिक गट विरोधात लढत असतात. विशेष म्हणजे दोन्ही गट काँग्रेसमधीलच आहेत. जवाहर आणि अँकर आहेत. दोन्हीही गटप्रमुख आता आम्ही एकच आहोत. अशी आरोळी निवडणूकांपूर्वी देत असतात. प्रत्यक्षात तसे पाहायला काही मिळत नाही. जिल्हा परीषदेत तर त्यांच्यामध्येच वर्चस्वाची लढाई असते. भाजप व सेना आठ दहा जागा मिळविण्यासाठी धडपड करीत असते. सप्टेंबरमध्ये सरासरी पंचवीस टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. नोटाबंदीनंतर, कर्जमाफीनंतरच्या या निवडणूकीत भाजपा, शिवसेना , काँग्रेस कि राष्ट्रवादी यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष सुरु होणार आहे. यात काँग्रेसचे दोन गट एकत्र तर युतीत बिघाडी होवून स्वतंत्र पॅनल तयार होणार आहेत. आगामी काळात पंचायतींवर वर्चस्वाचा संघर्षाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.

धुळे तालुक्‍यातील गटतट
धुळे तालुक्‍यात धनूर, न्याहळोद, नगाव, तिसगाव ढंढाणे आदी सत्तावीस ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत पुर्ण झाली आहे. तालुक्‍सासह जिल्ह्यातील सुमारे ऐंशी गावांमध्ये निवडणूकीचे नगारे वाजू लागले आहेत. गावगाड्यातील पुढारी मोर्चेबांधणी करीत आहेत. गटातटाच्या राजकारणाला वेग आला आहे. तालुक्‍यातील जवाहर गट, माजी आमदार (कै.) द.वा. पाटील गट यांच्यात खऱ्या अर्थाने अटीतटीच्या लढती होतात. यावेळेस माजी आमदार गटाला भाजपाचीही साथ मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे तयारीत गुंतलेले आहेत. शिवसेनाही स्वतंत्र पॅनल देण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वी सेना भाजपाने एकत्रितच निवडणूका लढल्या आहेत. आता त्यांच्या राजनितीकडे बघणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. राज्यपातळीसह जिल्ह्यातही युतीचे विळ्याभोपळ्याचे नाते तयार झाले आहे.

ग्रामपंचायतीवर झेंडा कोणाचा?
चार महिन्यापूर्वी तालुक्‍यातील काही ग्रामपंचायत सदस्यांनी कोलांट उड्या घेतल्यात. त्यांनी जवाहर गट तसेच माजी आमदार गट अथवा भाजपात गेल्याचे फोटोसेशनही नेत्यांच्या उपस्थितीत करुन घेतले. शेतकरी विविध कार्यकारी संस्थांच्याही निवडणूका झाल्यात. तिथेही वर्चस्व आमचेच अशी संधीही मुरब्बी राजकारण्यांनी सोडली नाही. निवडणूका त्यांना लढू द्यायच्यात. विजेत्यांना गटाकडे खेचायचे अन सरपंच बसवायचा. पंचायतीवर सत्तेचा झेंडा आमचा फडकल्याचे घोषीत करण्यात राजकारणी माहिर चालले आहेत.

गावगाड्यातील वारे
ग्रामपंचायतीची निवडणूक ही भाऊबंदकीतील वर्चस्वाची समजली जाते. जातीपातीलाही ऊत येतो. सत्ता बसविण्यासाठी गावाबाहेरील उमेदवारही आयात करण्याची पध्दत सुरु झाली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते अशा राजकारणाने मागे पडू लागले आहेत. गावातलाच पण बाहेर श्रीमंत झालेला राजकारणी हे एक हाती सत्ता बसविण्यात यशस्वी ठरत आहेत. तेच कोणत्या राजकीय तंबूत शिरायचे ठरवितात. अन पंचायतीवर त्या पक्षाचा अथवा गटाचा झेंडा फडकण्यास सुरुवात होत असते. हा प्रघात आता राजकीय प्रथेत रुपांतरीत होत आहे.

Web Title: dhule news marathi news sakal news grampanchayat election