काँग्रेसचे जेष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब देवरे अनंतात विलीन

दगाजी देवरे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

गांधी, विनोबांच्या विचारांचा पगडा..!
आरभापासूंनच बाळासाहेबावर महात्मा गांधी, विनोबा भावेच्या विचारांचा प्रभाव राहिला आहे. विनोबा भावेंच्या पदयात्रेत 45 ग्रामदानाचे योगदान बाळासाहेबांच्या प्रयत्नाना जाते. महिनाभर ते विनोबांच्या पदयात्रेत हा खानदेशचा सुपुत्र सक्रिय राहीला. सत विनोबा भावे, तुकडोजी महाराज, कै. यशवंतराव चव्हाण, मधुकरराव चौधरी, वसंतराव नाईक सारख्या महान व्यक्तीच्या सहवासात ते राहिल्याचे सांगितले जाते.

धुळे (म्हसदी) : संपूर्ण खानदेशात  लोकनेता, लोकसेवक म्हणून ओळख असलेले काँग्रेसंचे म्हसदी (ता. साक्री) जेष्ठ नेते बाळासाहेब उर्फ केदार सदाशिव देवरे (वय-91) यांचे मंगळवारी (ता. 5) पहाटे वृध्दकाळाने निधन झाले. काल (ता. 6) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. जीवनात स्वताची एक वेगळी ओळख बाळासाहेबांची होती. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होत खादी वापरत सामाजिक व राष्ट्रीय कामात योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या विषयी..!

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर फाळणीनंतर निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा त्यांच्या बाल मनावर आघात झाला. तेंव्हापासूनच ते दिल्लीच्या रिलीफ कमिटी सहभागी झाले. त्यावेळी कमेटीच्या अध्यक्षा सुचेता कृपलानी व भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचा सहवास लाभला. निर्वासितांसाठी तीन वर्षे काम केले. त्याचकाळात काँग्रेंस पक्षात फुट पडली. कै. भाऊसाहेब हिरेंनी पक्षाच्या साक्री तालुका पक्ष बांधण्याची जबाबदारी टाकली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. पक्षाच्या कार्याबरोबरच सोळा-गांव काटवान परिसरात शिक्षण प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली. म्हसदरीत छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून म्हसदी, बेहेड, वसमार, विराणे (ता. मालेगाव), चिराई (ता. सटाणा) येथे शैक्षणिक संस्था काढल्या. ते जिल्हा विकास मंडळाचे दहा वर्षे सचिव, लोकल बोर्ड (आताचे जिल्हा परिषद) चे कृषी व सहकार अध्यक्ष, साक्री पंचायत समितीचे पंधरा वर्षे सभापती, समाज राष्ट्रीय विस्तार योजनेचे उपाध्यक्ष, शेतकरी सहकारी संघाचे प्रशासक, परिवहन महामंडळाचे सल्लागार समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग कौन्सिलचे अध्यक्ष, पाझंरा कान सहकारी कारखान्यांचे उपाध्यक्ष, रोजगार हमी योजनेचे नऊ वर्षे अध्यक्ष, रत्नागिरी, ठाणे, कुलाबा, नाशिक, धुळे या पाच जिल्ह्यात नशाबंदीचे प्रमुख होते. आखिल भारतीय काँग्रेसं पक्षाचे राष्ट्रीय सचिव, जिल्हा हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, म्हसदीचे सरपंच व विकास संस्थेचे अध्यक्ष होते.

वीज पुरवठा व गाव तिथे एस.टी.साठी पाठपुरावा
बाळासाहेब देवरे यांनी तालुक्यातील शेकडो तरुणाना नोकरीला लावली आहे. तसेच त्याकाळी तालुक्यात गावोगावी वीज पुरवठा व एस. टी. पोहोचवावी म्हणून शासन दरबारी वैयक्तिकरित्या प्रयत्न केला आहे. ज्या दिवशी तालुक्यातील वीज आली त्यादिवशी पाचशे वीजपंप बसविण्यात आल्याचा ऊल्लेख केला जातो. खानदेशातील पहिला स्वाभिमानी, सेवाभावी गांधीवादी लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या स्वातंत्र्य सैनिकास मात्र शासनाच्या अनेक सुविधापासून वंचित रहावे लागले. शासनाकडे मानधनाची साधी मागणी त्यांनी केली नसल्याचे जाणकार सांगतात. 1952च्या दुष्काळामध्ये सैय्यदनगर बधा-यांचे कामात त्यांचे योगदान होते. म्हणून महसूल मंत्री भाऊसाहेब हिरे यांनी त्यांचे काम गौरवास्पद मानले.

वाढदिवस साजरा करणारे राज्यातील एक गांव
सामाजिक एकोपा टिकावा, वाढवा या उद्देशाने बाळासाहेबानी गांवाचा वाढदिवस साजरा केला. स्वातंत्र्य सैनिक व गावातील सर्वांत वृद्ध ग्रामस्थांना गांवाचे माता-पिता मानून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून पुजन व सत्कार करण्यात आला होता. गांवाचा वाढदिवस साजरा करणारे म्हसदी गांव राज्यात एकमेव ठरले होते. दै. सकाळने त्याविषयांला राज्यभर प्रसिद्धी दिली होती. त्यावर " गड्या आपुला गांव बरा "हा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. अशा आठवणी सकाळी ग्रामस्थांनी जागृत केल्या. त्यांनी व्यसनमुक्तीचे प्रणेते शेषराव महाराज यांच्याबरोबर राज्यभर व्यसनमुक्तीचा प्रचार केला. म्हसदीत व्यापक असा व्यसनमुक्ती मेळावा घेतला होता. त्यात दीड लाख जनसमुदाय उपस्थित होता. अशा लोक नेत्यांस आज सायंकाळी म्हसदीत शिवाजी विद्यालयाच्या प्रागंणात हजारोच्या उपस्थितीत निरोपदेण्यात आला.

Web Title: dhule news mhasdi gandhian leader deore passes away