मोपलवारशी संबंधित ३५ ‘टेप’ माझ्याकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

धुळे - राज्य रस्ते विकास महामंडळाचा पदच्युत उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार याच्यावर झालेली आताची कारवाई ही समृद्धी महामार्गाच्या प्रकरणात नाही; तर आघाडी शासनाच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांच्या प्रकरणाशी निगडित आहे. मोपलवारशी संबंधित ३५ ‘ऑडिओ सीडी’ माझ्याकडे आहेत, अशी माहिती सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

धुळे - राज्य रस्ते विकास महामंडळाचा पदच्युत उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार याच्यावर झालेली आताची कारवाई ही समृद्धी महामार्गाच्या प्रकरणात नाही; तर आघाडी शासनाच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांच्या प्रकरणाशी निगडित आहे. मोपलवारशी संबंधित ३५ ‘ऑडिओ सीडी’ माझ्याकडे आहेत, अशी माहिती सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

मोपलवार आणि मांगले अपहरण प्रकरणाशी संबंधित आमदार गोटे आणि भाजपच्याच एका भिसे नामक कार्यकर्त्यांमधील संभाषणाची ‘ऑडिओ टेप’ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी शुक्रवारी उघड केल्यानंतर त्यावर खुलाशासाठी आमदार गोटे यांनी येथील गुलमोहर विश्रामगृहात आज पत्रकार परिषद घेतली. तीत गोटे यांनी मोपलवारच्या गैरव्यवहारांची मोडस ऑपरेंडी, त्याबाबत केलेल्या तक्रारी व सभागृहात मांडलेली लक्षवेधी व औचित्याचा मुद्दा आणि मोपलवारवर झालेली कारवाई आदी विविध बाबींवर माहिती दिली.

‘समृद्धी’मुळे कारवाई नाही
समृद्धी महामार्ग प्रकल्पात काही करण्यापूर्वीच मोपलवारला सरकारने बाजूला केल्याचे गोटे म्हणाले. मोपलवार याच्या ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची तक्रार पंतप्रधान कार्यालयापासून ते इडी, एसीबी, सीबीआय, सेंट्रल व्हिजिलन्स अशा सर्व ठिकाणी केली. चौकशी सुरू झाली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत मला सहा स्मरणपत्रे दिली आहेत. याच प्रकरणात २२ ते २४  ऑगस्टदरम्यान मला भेटायलाही बोलावले आहे.

औचित्याचा मुद्दा मांडला
मोपलवार प्रकरणी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली होती. अध्यक्षांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे औचित्याच्या मुद्याद्वारे हा प्रश्‍न सभागृहात मांडला. राधाकृष्ण विखे- पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे- पाटील यांनाही या प्रकरणाची मी माहिती दिली होती. मोपलवार व अन्य सहा ते सात आयएएस अधिकाऱ्यांनी तोट्यात गेलेली कोलकत्याची कंपनी घेतली. ही कंपनी वर्षात फायद्यात आली. सर्व अधिकाऱ्यांची टक्केवारीच आपण सभागृहात मांडली. पक्षाचे नेते, मुख्यमंत्री अथवा पक्षातून कुणीही आपल्याला मोपलवार प्रकरण काढू नका, असे सांगितले नाही अथवा नाराजीही व्यक्त केली नसल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले.

मोपलवारबाबत ३५ सीडी
मोपलवारशी संबंधित ३५ ऑडिओ सीडी आपल्याकडे असल्याचा दावाही गोटे यांनी केला. सतीश मांगले व मोपलवार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ टेप त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकविली. कुणाचे फोन टॅप करणे ही सहज सोपी गोष्ट असल्याचे गोटे म्हणाले. तंत्रज्ञान खूप पुढे गेल्याचा दाखलाही त्यांनी यासाठी दिला. मोपलवार हा फोन टॅप करण्याचेच काम करत होता. मांगले व त्याच्या चार ते पाच मित्रांनी एक डिटेक्‍टिव्ह कंपनी स्थापन केली होती, असेही गोटे म्हणाले. मोपलवार प्रकरणात १६ ऑगस्टला दुपारी चारला मंत्रालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: dhule news mopalwar related recording