"सात राष्ट्रीय महामार्गांचा देशातील एकमेव जिल्हा धुळे"

निखिल सूर्यवंशी
शुक्रवार, 26 मे 2017

  • सात महामार्ग विणणार धुळ्याच्या विकासाचे जाळे 
  • चार नव्या मार्गांमुळे राज्य, परराज्यात वेगवान संपर्काचे वरदान 

रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने हा लाभ पदरात पडला. नव्याने जाहीर व बळकटीकरणातील चार राष्ट्रीय महामार्गांसाठी धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सरासरी 151 किलोमीटरपर्यंतच्या कामासाठी एकूण सुमारे 1750 कोटींहून अधिक निधी मिळेल. या चार महामार्गांच्या विकासासाठी 'डीपीआर' (डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट) तयार करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. ते झाल्यावर कामाला सुरवात होऊ शकेल. 
- डॉ. सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री

धुळे  ः बॅरेजेस, सिंचन प्रकल्पांमुळे पाण्याचा मुबलक साठा, परिणामी औद्योगिक वसाहतींचा विकास, महामार्ग चौपदरीकरणामुळे दळणवळणाची बळकट सुविधा, दोन विमान तळे, चार रेल्वे स्थानके, आशिया खंडामधील सर्वांत मोठा सोलर सिटी प्रकल्प आदींमुळे जागतिक औद्योगिक नकाशावर चमकणारा धुळे आता देशातील एकमेव सात राष्ट्रीय महामार्गांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे गुंतवणुकींच्या संधींपासून औद्योगिक विकास, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा दृढविश्‍वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, की पूर्वीच धुळे- नाशिक, धुळे ते मध्य प्रदेश सीमेपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. नंतर धुळे ते औरंगाबाद या 63 किलोमीटरच्या मंजूर महामार्ग चौपदरीकरणासाठी 876 कोटींचा निधी खर्च होईल. 

जिल्ह्यात सात राष्ट्रीय महामार्ग 
असे असताना मोदी सरकारने जिल्ह्यातून जाणारे चार मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहेत. जिल्ह्यात आधीपासून असणारा मुंबई- आग्रा, नागपूर- सुरत, धुळे ते औरंगाबाद या तीन राष्ट्रीय महामार्गांनतर नव्याने चार अशा महामार्गांची भर पडली आहे. यामध्ये शेवाळी- निजामपूर- नंदुरबार- तळोदा- अक्कलकुवा हा (चौपदरीकरणासह) धुळे जिल्ह्यातील 32 किलोमीटरचा आणि 450 कोटींच्या किमतीचा, शिर्डी ते नगर विभाग वगळून साक्री- सटाणा- देवळा- चांदवड- मनमाड- येवला- कोपरगाव- शिर्डी- राहुरी- नगर- काडा- आष्टी- जामखेड- बीड हा धुळे जिल्ह्यातील 33 किलोमीटर आणि 280 कोटींच्या किमतीचा, दोंडाईचा- कुसुंबा- डोंगराळे- मालेगाव हा धुळे जिल्ह्यातील 66 किलोमीटर आणि 560 कोटींच्या किमतीचा, सोनगीर- शहादा- स्वात- मोहोल- कुरूड- कसाठे- बारूलनगर हा धुळे जिल्ह्यातील 51 किलोमीटर आणि 460 कोटींच्या किमतीचा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला आहे. 

बाजारपेठ येतील जवळ 
विकासासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांच्या विकासामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून 2019 साठीच्या अंमलबजावणीसाठी निवड झालेला दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे आपसूक सुरू होऊ शकणार आहे. तो हजारो हातांना काम देणारा प्रकल्प ठरणार आहे. नव्याने चार राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि बळकटीकरणामुळे गुंतवणुकीच्या नव्या संधी जिल्ह्यात चालून येतील. औद्योगिक विकास, हॉटेल व्यवसायासह मालवाहतूक, शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणखी पोषक स्थिती निर्माण होईल.
या चार राष्ट्रीय महामार्गांसह पूर्वीच्या तीन राष्ट्रीय महामार्गांमुळे गुजरात, मध्य प्रदेश, नाशिक, मुंबईसह राज्यातील विविध बाजारपेठा धुळे जिल्ह्याच्या आणखी जवळ येतील. त्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. शिवाय महामार्गांच्या लगतचे तालुका, गावेही जिल्ह्याच्या जवळ येऊन व्यापारउदीम वाढीसाठी लाभ होऊ शकेल. पाठपुराव्याअंती 'सीआरएफ- फंड'मध्ये नव्याने चार राष्ट्रीय महामार्ग समाविष्ट झाल्याने जिल्ह्याला हा लाभ मिळू शकत असल्याचे मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले. 

Web Title: dhule news the most number of national highways in dhule