तुमच्या गावाला शाळा हाय; पास मिळणार नाय!

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 18 जुलै 2017

खेड्यावरच्या बर्‍याच विद्यार्थीनींना मोफत पास देण्यास धुळे बस आगार टाळाटाळ करीत आहे. तुमच्या गावात शाळा आहे. तिथे शिक्षण घ्या. येथे शहरात काय आहे, असा अनाहूत सल्लाही देत आहेत.

धुळे : प्रत्येक गावात शाळा आहे. तिथे पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण मिळतेच. तुम्ही का म्हणून शहरात येतात. चला निघा येथून. मोफत पास नाही मिळणार. गावातच शिका. शहरात यायचेच असेल तर सवलितीची पास काढा...

हा अफलातून सल्ला देत धुळे बस आगारातील कर्मचारी खेड्यांवरील मुलींना हुसकावून लावत आहेत. 'काका आमच्या गावात सेमी आणि पूर्ण इंग्लिश माध्यम नाही. म्हणून येतो. आता तरी पास द्या. हे बघा शाळेचे पत्र,' अशी आर्जवं विद्यार्थीनी करीत आहेत. पण काकांना दयामायाच नाही. 'ते हुसकावून लावतात,' अशी कैफियत विद्यार्थीनी मांडतात. 

अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना
विद्यार्थीनींना शिक्षणाची सोय व्हावी. यासाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना आहे. खेड्यापाड्यांवरच्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलीही गेल्या पाच वर्षांपासून शहरात शिकायला जात आहेत. शिक्षणाची मोठी सोय झाली आहे. मराठीशिवाय इतर माध्यमांमध्येही प्रवेश घेत आहेत. या योजनेतील अटी आणि शर्ती बर्‍याच आहेत. स्थानिक पातळीवर लवचिकता दाखवत शहरात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण प्रशंसनीय वाढले आहे.

आताच कशी पास बंद झाली ?
खेड्यावरच्या बर्‍याच विद्यार्थीनींना मोफत पास देण्यास धुळे बस आगार टाळाटाळ करीत आहे. तुमच्या गावात शाळा आहे. तिथे शिक्षण घ्या. येथे शहरात काय आहे, असा अनाहूत सल्लाही देत आहेत. खेडोपाडी शाळा आहेत. त्यांचा दर्जा कसा आहे, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. पण शहराकडे जाणार्‍या मुली सेमी व एंटायर इंग्लिश माध्यमाकडे वळल्या आहेत. ती सुविधा अद्यापही खेड्यांमध्ये नाही. महाजन शाळेतील विद्यार्थीनींना मोफत पास मिळाला आहे. इतर शाळांच्या विद्यार्थीनींना देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यांना दरवर्षी मोफत पास दिली जात होती. आताच हा फतवा काढल्याने मुलींमध्ये नाराजी तर पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

विद्यार्थीनी करणार आंदोलन
कापडणे, धनूर, सरवड, देवभाने, न्याहळोद, बिलाडी, तामसवाडी , सायने आदी गावांतील विद्यार्थीनी पालकांच्या मदतीने धुळे आगारात आंदोलन करणार आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Dhule News MSRTC depot rejects passes to girl students