सोनगीरमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

एल. बी. चौधरी
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

योजना कुचकामी
खेळाचा विकासासाठी शासनाने गाव तेथे क्रीडांगण तसेच पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान राबविले. अनेक गावांनी सहभाग घेतला. काही गावांना क्रीडांगण बांधकामासाठी निधीही देण्यात आला. मात्र योग्य जागेअभावी क्रीडांगण अपूर्णावस्थेत सोडून देण्यात आले. पायका अंतर्गत गावोगावी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रिडाश्री म्हणून तज्ज्ञ खेळाडूंची नेमणूक करण्यात येऊन प्रशिक्षण देण्यात आले. खेळाचे साहित्य मिळाले. मात्र त्यानंतर दुर्लक्ष होऊन शासनाचे लाखो रुपये खर्च वाया गेला. 

सोनगीर (जि. धुळे)  : आज (मंगळवार) राष्ट्रीय क्रीडा दिन असून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागात अद्यापही खेळांबाबत निराशाजनक स्थिती आहे. अॉलिंपिकमध्ये पदकाची अपेक्षा केली जाते आणि खेळाचा विकासाबाबत दुर्लक्ष होतो, असा विरोधाभास दिसून येतो.

शासनाने गाव तेथे क्रीडांगण तसेच पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) या व अन्य योजना प्रभावी न ठरल्याने तसेच खेळासाठी विशेष नियोजन न झाल्याने ग्रामीण भागात क्रीडांगणच राहिले नाहीत. परिणामी ग्रामीण युवक खेळापासून दुरावला आहे. युवा वर्ग संगणक व मोबाईलवरील खेळात तसेच सोशल नेटवर्किंग वापरण्यात गुंग झाला आहे. मैदानी खेळाअभावी युवकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

पुर्वी ग्रामीण भागात साहित्याची फारशी गरज नसलेले विटीदांडू, लगोरी, सुर-पारंब्या, कबड्डी, लंगडी, चोर-पोलीस, लपंडाव, खोखो आदी सुमारे 25 खेळ खेळले जायचे. त्यामुळे ग्रामीण युवक शारिरीकदृष्ट्या फीट असत. कालौघात हे खेळप्रकार दिसेनासे झाले. त्याजागी क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आदी खेळ आले. बास्केटबॉल, फूटबॉल, टेबल टेनिस, हॉकी, लॉनटेनिस आदी खेळांना साहित्य, मैदान व प्रशिक्षक अभावी ग्रामीण युवक दूरच राहिले. याच कारणामुळे व शासन-प्रशासनाचे दुर्लक्षामुळे अॅथेलॅटीक्सकडेही कल वाढला नाही. जनजागृती, प्रसार व प्रोत्साहन नसल्याने ग्रामीण भागातील मुली बालपणीच खेळाला मुकल्या आहेत. 

हजारो कुस्तीगीर दुर्लक्षित
ग्रामीण भागात आजही सर्वाधिक लोकप्रिय खेळ कुस्ती असून गावोगावी अनेक कुस्तीगीर आहेत. जिल्ह्य़ात पाच हजार कुस्तीपटू आहेत. गावोगावी होणाऱ्या यात्रा हेच कुस्तीपटूंचे कौशल्य अजमावण्याचे ठिकाण असून इतरवेळी कुठेही कुस्ती होत नाही. यात्रेत पहिलवानांची गर्दी होत असल्याने अनेकांना संधीच मिळत नाही. कुठले प्रशिक्षण नाही. गादीवरील कुस्तीबाबत माहित नाही. शासन व क्रीडा विभागाकडून स्पर्धांचे आयोजन नाही. यापार्श्वभुमीवर हजारो कुस्तीगीरांना संधी न मिळाल्याने मिळेल ते काम करीत आयुष्य कंठीत आहेत. 

योजना कुचकामी
खेळाचा विकासासाठी शासनाने गाव तेथे क्रीडांगण तसेच पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान राबविले. अनेक गावांनी सहभाग घेतला. काही गावांना क्रीडांगण बांधकामासाठी निधीही देण्यात आला. मात्र योग्य जागेअभावी क्रीडांगण अपूर्णावस्थेत सोडून देण्यात आले. पायका अंतर्गत गावोगावी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रिडाश्री म्हणून तज्ज्ञ खेळाडूंची नेमणूक करण्यात येऊन प्रशिक्षण देण्यात आले. खेळाचे साहित्य मिळाले. मात्र त्यानंतर दुर्लक्ष होऊन शासनाचे लाखो रुपये खर्च वाया गेला. 

खेळाकडे दुर्लक्ष
मैदाने व प्रोत्साहन नसल्याने ग्रामीण भागातील युवक खेळापासून दुरावला. ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर पोहोचणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. धनुर्विद्या, तलवारबाजी, नेमबाजी, तायक्वांदो, डॉजबॉल आदी खेळांनी ग्रामीण भागात प्रवेशही केला नाही. पोलीस, सैनिक भरतीसाठी सरावाला मैदान नाही अशी स्थिती आहे. 
यापार्श्वभुमीवर क्रीडा विभागाने खेळांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा. मैदानावर होणारे अतिक्रमण प्रशासनाने काढणे व थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीला आदेश करावे. प्रत्येक गावात क्रीडांगण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

ग्रामीण भागातील युवकांना साहित्य व क्रीडांगण अभावी मैदानी खेळाचे आकर्षण राहिले नाही. शासनाचे प्रोत्साहन नाही. खेळ विकासासाठी योजना असल्या तरी ते योग्य राबविले जात नाही. केवळ शहरीभागाचा खेळाचा विकास होत आहे. यासंदर्भात उपाययोजना न झाल्यास ग्रामीण भागातून खेळ हद्दपार होतील. 
- किशोर लोहार, क्रीडाश्री, सोनगीर

Web Title: Dhule news national sports day in Songir