निजामपूर-जैताणेत तिथीनुसार सर्वपक्षीय शिवजयंती साजरी

प्रा.भगवान जगदाळे
मंगळवार, 6 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त रविवारी (ता.4) निजामपूर-जैताणे ह्या दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन शिवभक्त व शिवप्रेमींनी सजीव देखाव्यांसह शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढली.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त रविवारी (ता.4) निजामपूर-जैताणे ह्या दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन शिवभक्त व शिवप्रेमींनी सजीव देखाव्यांसह शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढली.

बग्गीवर स्वार शिवभक्त भय्या शिंपी यांनी छत्रपती शिवरायांची हुबेहूब भूमिका साकारली. तर इतर शिवभक्तांनी घोडेस्वार मावळ्यांची हुबेहूब भूमिका साकारली. शिवरायांचा अर्धाकृती पुतळा सजविलेल्या ट्रॅक्टरवर विराजमान होता. गावातील महिला भगिनींतर्फे चौकाचौकात शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे औक्षण केले जात होते. तत्पूर्वी सकाळी नऊला शिवप्रेमी युवकांनी दोन्ही गावांतून भव्य मोटारसायकल रॅलीही काढली होती. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला घनश्याम महाराज आर्वीकर या बालकीर्तनकाराचे सुश्राव्य जाहीर शिवव्याख्यान झाले. ग्रामदेवता भवानीमाता मंदिरापासून सायंकाळी पाच वाजता डीजे व ढोलताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीचा समारोप रात्री दहाच्या सुमारास बसस्थानकाजवळील चिंचचौकात झाला. जैताणे ग्रामपंचायत चौकात 'टायगर ग्रुप'ने मिरवणुकीला हजेरी लावली तेव्हा युवकांनी एकच जल्लोष केला होता.

धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा पोलीस बंदोबस्त निजामपूर-जैताणेत लावण्यात आला होता. साक्रीचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे व निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर आदींसह तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली १११ पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात साक्री व धुळे येथील आरसीपी पथक, एसआरपीएफ पथक, क्रॅश प्लाटू, होमगार्ड आदींचा समावेश होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणूक शांततेत पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी व शिवभक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: dhule news nijampuar jaitane shivjayanti