जैताणेचा आठवडे बाजार राष्ट्रीय महामार्गावर तर...

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील '७५३-बी' या राष्ट्रीय महामार्गालगत भरणाऱ्या सोमवारच्या आठवडे बाजारात आरोग्य केंद्र व आदर्श विद्या मंदिराचे प्रवेशद्वार, खुडाणे चौफुली व बसस्थानक परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. महामार्गलगत भरणाऱ्या या आठवडे बाजाराला पर्यायी जागेवर भरवावे अशी काही ग्रामस्थांची मागणी आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील '७५३-बी' या राष्ट्रीय महामार्गालगत भरणाऱ्या सोमवारच्या आठवडे बाजारात आरोग्य केंद्र व आदर्श विद्या मंदिराचे प्रवेशद्वार, खुडाणे चौफुली व बसस्थानक परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. महामार्गलगत भरणाऱ्या या आठवडे बाजाराला पर्यायी जागेवर भरवावे अशी काही ग्रामस्थांची मागणी आहे.

वास्तविक राष्ट्रीय महामार्गालगत आठवडे बाजार भरविणे म्हणजे ग्रामस्थांच्या जीविताशी खेळण्यासारखा प्रकार आहे. जैताणे ग्रामपंचायतीने हा बाजार पर्यायी जागेवर भरविण्याची गरज आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला व चौपदरीकरणाला सुरुवात झाल्यास अनेक अतिक्रमणे तुटण्याचीही दाट शक्यता आहे. आणि जर त्याला विरोध झालाच तर मग बायपास अथवा उड्डाणपूल हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. पर्यायी बायपास रोड अथवा उड्डाणपूल झालाच तर गावातील व्यवसाय व उद्योगधंद्यांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून ग्रामपंचायतीने आतापासूनच त्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

दैनंदिन भाजीबाजार दोन ठिकाणी, लिलाव मात्र तिसऱ्याच ठिकाणी...
सद्या जैताणेतील भाजीबाजार हा दोन ठिकाणी भरतो. रुपाली चौकातील गुजरीत व जैताणे ग्रामपंचायत चौकात.

भाजीपाला लिलाव मात्र दिवंगत सरपंच वेडू नागो महाजन यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केटमध्ये होतो. वास्तविक या भाजीपाला मार्केटमध्ये विक्रेत्यांनी बसणे अपेक्षित असताना विक्रेते आजही रस्त्यावरच भाजीपाला विकणे पसंत करतात. त्यामुळे जैताणे ग्रामपंचायत चौक व रुपाली चौकातही वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. हा इतस्ततः विखुरलेला दैनंदिन भाजीबाजारही एकाच ठिकाणी भरविणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायतीस लाखोंचा महसूल...
आठवडे बाजार व दैनंदिन भाजीबाजारापासून जैताणे ग्रामपंचायतीस दरवर्षी लाखों रुपयांचा महसूल मिळतो. मात्र सुविधांबाबत अनास्था दिसून येते. विक्रेत्यांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, ओटे बांधणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायत चौकाचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे.

सेंट्रल बँक शाखा व महा-ईसेवा केंद्र याच चौकात असल्याने वाहने पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोकाट जनावरांचीही मोठी समस्या आहे. पण याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

निजामपूरचा आठवडे बाजार वाऱ्यावर
मोठा गाजावाजा करून सुरू झालेला निजामपूरच्या मेनरोडवर बुधवारी भरणारा आठवडे बाजार मात्र सद्या शेवटच्या घटका मोजत आहे. जैताणेत राष्ट्रीय महामार्गावर व शिवाजीरोडवर भरणारा सोमवारचा आठवडे बाजार पूर्वी निजामपुरात भरत होता. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मेनरोडच्या काँक्रीटीकरणाचे काम मंगळवारपासून सुरू करणे अपेक्षित असताना शनिवारी, रविवारी हे काम सुरू केले. त्यामुळे तत्कालीन सोमवारचा आठवडे बाजार एका दिवसासाठी पर्यायी जागेवर भरविण्याचे ठरले. तेव्हापासूनच हा आठवडे बाजार कायमस्वरूपी जैताणेत भरतो आहे. मध्यंतरीचा काही काळ गेल्यानंतर निजामपूरकरांनी व्यापारी, विक्रेते, शेतकरी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बुधवारी आठवडे बाजार सुरू केला. त्याला सुरुवातीस चांगला प्रतिसाद मिळाला. आज मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा आठवडे बाजार शेवटच्या घटका मोजत आहे. त्यासाठी आठवडे बाजाराचा वार बदलल्यास नक्कीच फायदा होऊ शकेल, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: dhule news nijampur jaitane market and national highway