म्हसाई माता महिला पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 5 मार्च 2018

"या पुरस्काराचे खरे श्रेय नियमित ठेवीदार, कर्जदार, सभासद, संचालिका मंडळ, सल्लागार मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारी यांनाच जाते. पतसंस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाबेन शाह, उपाध्यक्षा शैलजा सोंजे, व्यवस्थापक निलेश जयस्वाल आदींसह संचालिका मंडळ व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करतो.."
- लक्ष्मीकांत शाह, संस्थापक अध्यक्ष, म्हसाई माता महिला पतसंस्था, निजामपूर-जैताणे ता. साक्री.

निजामपूर-जैताणे (धुळे): येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेला नुकताच लोणावळा (जि. पुणे) येथे एका कार्यक्रमादरम्यान 'बँको' हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन, बँकिंग क्षेत्रातील नामांकित प्रकाशन संस्था 'बँको' व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल हॉटेल फरीयास रिसॉर्ट, लोणावळा येथे 'ऍडवांटेज-2018' या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार देण्यात आला.

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, बँको अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे व पुणे येथील गॅलेक्सि इनमा सिस्टीम सर्व्हिसेसचे संचालक अशोक नाईक यांच्या हस्ते पतसंस्थेच्या संचालिका संगीता जयस्वाल, वंदना शाह, स्नेहल राणे, आशा सूर्यवंशी व व्यवस्थापक निलेश जयस्वाल यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. पन्नास कोटीपर्यंत ठेवी असलेल्या पतसंस्थांचे निवड समितीमार्फत प्रश्नावलीद्वारा मूल्यांकन करण्यात आले. त्यात म्हसाई माता महिला पतसंस्था मर्यादित निजामपूर या नामांकित पतसंस्थेची पुरस्कारासाठी निवड झाली.

पतसंस्थेला आतापर्यंत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय एकूण सहा पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात जिल्हा पतसंस्था फेडरेशनतर्फे सन-2006 चा 'आदर्श पतसंस्था' पुरस्कार, उत्तर महाराष्ट्रातून सन 2011 व 2017 चा 'प्रतिबिंब' हा प्रथम विभागीय पुरस्कार, सन 2016 व 2017 चा 'दीपस्तंभ' हा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार आदींचा त्यात समावेश आहे. ग्रामीण भागातील पतसंस्थेला मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी पतसंस्थेचे संचालिका मंडळ, ठेवीदार, सभासद व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Web Title: dhule news nijampur jaitane mhasai mata patsanstha award