पाण्यासाठी महिलांचा एल्गार; ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 3 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील वासखेडी (ता. साक्री) येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी (ता. 2) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य व भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य 'हंडा'मोर्चा काढला. त्यानंतर संतप्त महिलांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले.

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील वासखेडी (ता. साक्री) येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी (ता. 2) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य व भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य 'हंडा'मोर्चा काढला. त्यानंतर संतप्त महिलांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले.

महिलांसह ग्रामस्थांनी 'सकाळ'कडे वाचला समस्यांचा पाढा...
वासखेडी येथील संतप्त महिला व ग्रामस्थांनी 'सकाळ'कडे समस्यांचा पाढाच वाचला. त्यात कृत्रिम पाणीटंचाई, अनियमित वीजपुरवठा, ग्रामस्वच्छतेकडे दुर्लक्ष, गटारी, गावविहिरीची अस्वच्छता, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा, जळालेली डीपी, नियोजनशून्य कारभार, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेविका यांचा मनमानी कारभार, नमुना नंबर आठचे जुने रजिस्टर गायब, पोटनिवडणूक काळात सरपंच, ग्रामसेविकांची अनियमित उपस्थिती, शिपाई व कर्मचाऱ्यांची निष्क्रियता, डीपीसाठीचा पंधरा हजाराचा निधी महिन्याभरापासून सरपंचांनी स्वतःकडे ठेवल्याचा आरोप गंभीर आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.

सामूहिक राजीनाम्याची मागणी...
सरपंच, उपसरपंचांसह सत्तेतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे देऊन ग्रामपंचायत खाली करावी व ग्रामपंचायतीवर त्वरित प्रशासकाची नेमणूक व्हावी. अशी मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. वासखेडी ग्रामपंचायत ही नऊ सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायत असून तीत वासखेडी व जामकी या दोन्ही गावांचा समावेश होतो. गावचे सरपंच जामकी येथे राहतात. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच हरविल्याची उपरोधिक कैफियतही ग्रामस्थांनी मांडली. सद्या वासखेडी ग्रामपंचायत पोरकी व निराधार झाल्याचा घणाघाती आरोपही ग्रामस्थांनी केला. धुलीवंदनाची सुटी असल्याने ग्रामसेविकेशी संपर्क होऊ शकला नाही. उद्या याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नंदू नेरकर यांनी दिली.

पाणी द्या नाही तर फाशी द्या...
ग्रामपंचायतीने आम्हाला पाणी द्यावे नाही तर फाशी द्यावी. अशी संतप्त मागणी एका युवकाने केली. एक वेळेस गावात दारू मिळेल पण पाणी मिळणार नाही अशी अवस्था असल्याचे काही संतप्त महिलांनी सांगितले व 'आम्हाला पाणी द्या नाही तर दारू द्या' अशी अनोखी मागणी केली.  ग्रामपंचायतीकडे पाणी असलेल्या दोन विहिरी व एक बोअर असूनही केवळ योग्य नियोजनाअभावी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशी खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून महिलांना दोन-दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध महिलांची पाण्यासाठी प्रचंड कुचंबणा होते असेही सांगण्यात आले. मासिक सभा व ग्रामसभेला बरेचसे ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहत असल्याचा आरोपही करण्यात आला. ग्रामस्थ आहेत पण ग्रामपंचायत कुठे आहे.? असा खडा सवालही करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वनीसर माळचे, शोभाबाई मुजगे, जितेंद्र शिंदे आदींनीही 'सकाळ'ला प्रतिक्रिया दिल्या. याबाबत केवळ पाठपुरावा सुरू असल्याची जुजबी माहिती त्यांनी दिली. बालाजी कुवर, दत्तात्रय कुवर, भीमराव साळवे, सागर खारकर, दिनेश दहिते, सुनंदाबाई पाटील, गोकुळबाई चैत्राम, युवराज मुजगे, विमलबाई मुजगे, विशाल कुवर, विवेक कुवर आदींनी संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी महिलांसह ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता..!

Web Title: dhule news nijampur jaitane waskhedi gram panchayat women water