धुळ्यात जनजीवन विस्कळित, तणावपूर्ण शांतता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर शहरात सोमवारी रात्री साडेनऊनंतर पडसाद उमटू लागले. देवपूर हद्दीतील नगावबारी परिसरात मोटारसायकलवरील तीन तरुणांनी बसच्या दर्शनीय भागातील काचा फोडल्या. नंतर पारोळा रोडवरील आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बसच्या काचा फोडण्यात आल्या. चार ते पाच मोटारसायकलवरील ट्रिपल सीट असलेल्या तरुणांनी हा प्रकार केला

धुळे - भीमा कोरेगाव (जि. पुणे) येथील घटनेचे तीव्र पडसाद आज (मंगळवारी) धुळे शहरातही उमटले. ठिकठिकाणी एसटी बस, काही दुकाने, वाहने आणि साक्री रोडवर झालेल्या दगडफेकीमुळे दुपारी बारानंतर जनजीवन ठप्प झाले. चहू भागातील दुकाने बंद झाली. शहर तणावाखाली गेले. हे प्रकार ठिकठिकाणी सुरूच राहिल्याने पोलिसांची दमछाक झाली. नंतर कठोर पवित्रा घेत पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. शहरात सद्यःस्थितीत तणावपूर्ण शांतता असून व्यवहार ठप्प होते. एसटीसह अन्य वाहतूकीची सेवाही ठप्प आहे. 

भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर शहरात सोमवारी रात्री साडेनऊनंतर पडसाद उमटू लागले. देवपूर हद्दीतील नगावबारी परिसरात मोटारसायकलवरील तीन तरुणांनी बसच्या दर्शनीय भागातील काचा फोडल्या. नंतर पारोळा रोडवरील आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बसच्या काचा फोडण्यात आल्या. चार ते पाच मोटारसायकलवरील ट्रिपल सीट असलेल्या तरुणांनी हा प्रकार केला. रात्री अकरापर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी गस्त वाढविली तरी तेव्हाच शहर काहीसे तणावाखाली गेले होते. 

धुळ्यात चौफेर तणाव 
सकाळी शांतता असताना मंगळवारी दुपारी बाराला साक्री रोडवर भीमनगरजवळ भीमा कोरेगावमधील घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दलित नेत्यांनी शांततेचेही आवाहन केले. त्यावेळी पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, याच भागात दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगविण्यास सुरवात केली. त्यापाठोपाठ पेठ भागातील महाराणाप्रताप चौक, देवपूरमधील दत्तमंदिर परिसर, पारोळा रोडवरील प्रकाश चित्रपटगृह, मालेगाव रोडवरील मनोहर चित्रपटगृह आणि दसेरा मैदान, वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल, जेल रोड परिसरातील मुख्य बसस्थानक परिसरात जमाव जमल्याने रस्त्यावरील व्यावसायिकांसह दुकानदारांनी व्यवहार बंद केले. 

एसटी बस, वाहनांचे नुकसान 
शहरात दंगल झाल्याच्या अफवेने शहर ढवळून निघाले. परिणामी, शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतल्याने स्थितीत अधिकच गोंधळ निर्माण झाला. पालकही धास्तावले. या कालावधीत ठिकठिकाणी हुल्लडबाजांनी दहाहून अधिक एसटी बसवर दगडफेक करीत काचा फोडल्या. बसस्थानक परिसरात दोन बसवर दगडफेक झाल्याने प्रवाशांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भीतीमुळे पळापळ सुरू केली. तुळशीरामनगर, त्र्यंबकनगर व काही भागांत हुल्लडबाजांनी मोटारसायकलवरून भरधाव जात वाहनांवर दगडफेक केल्याने कॉलनीवासीय धास्तावले. पंधराहून अधिक वाहनांची तोडफोड हुल्लडबाजांनी केली. साक्री रोडवरील स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस प्रशासनाला शहरात चहू बाजूने असे काही प्रकार घडत असताना नियंत्रण आणण्यास दमछाक होत होती. दुपारी दोननंतर स्थिती नियंत्रणात आली, परंतु अनामिक भीतीमुळे जनजीवन विस्कळितच होते. दुकाने बंदच असल्याने व्यवहार ठप्प होते. हातावर पोट असणाऱ्या शेकडो हॉकर्सधारकांची या स्थितीमुळे कोंडी झाली. शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. शहरात संचारबंदीसदृश्‍य स्थिती दुपारी सव्वापाचपर्यंत कायम होती. 

Web Title: dhule news: north maharashtra agitation