धुळ्यातील तीन अधिकारी ‘एसीबी’च्या रडारवर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

धुळे - येथील जिल्हा परिषदेच्या लाच (रिव्हर्स ट्रॅप) प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या पंचायत राज समितीच्या दौऱ्यानंतर आणखी तीन अधिकारी तपासी यंत्रणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. त्यांना आज  (ता. १२) अटकेची शक्‍यता असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेले ‘डेप्युटी सीईओ’ तुषार माळी यांच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या संपत असून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले आहेत.   

धुळे - येथील जिल्हा परिषदेच्या लाच (रिव्हर्स ट्रॅप) प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या पंचायत राज समितीच्या दौऱ्यानंतर आणखी तीन अधिकारी तपासी यंत्रणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. त्यांना आज  (ता. १२) अटकेची शक्‍यता असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेले ‘डेप्युटी सीईओ’ तुषार माळी यांच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या संपत असून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले आहेत.   

जिल्ह्यात पाच ते सात जुलैला पंचायत राज समिती दौऱ्यावर येऊन गेली. त्यावेळी झालेल्या लाच प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, तीन अधिकारी ‘एसीबी’च्या रडारवर असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. अटकेतील संशयित माळी यांनी ‘लाचेतील दीड लाखाची रक्कम माझीच होती’, असा जबाब दिल्याने या प्रकरणाने वळण घेतले असताना ‘एसीबी’चे नाशिक विभागीय पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, येथील पोलिस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी मात्र तपासाला योग्य दिशा दिली आहे. यातून अनेक रहस्यमय व धक्कादायक बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. 

संशयित माळी रुग्णालयात
‘एसीबी’ने काल पंचायत राज समितीबाबत जिल्हा परिषदेतील सर्व दप्तर ताब्यात घेतले. दरम्यान, अटकेतील संशयित ‘डेप्युटी सीईओ’ माळी यांची प्रकृती सोमवारी (ता. १०) बिघडली. त्यांना ‘डिसेंट्री’चा त्रास होत असून, ताप आला. त्यामुळे त्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

आमदार गोटे यांची तक्रार
‘एसीबी’ने तपासाला गती दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष आमदार अनिल गोटे यांनाही या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली असून, त्यांनी योग्य तपास करण्याचा आदेश यंत्रणेला दिला आहे. यात मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी आमदार गोटे यांनी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमध्ये सात जुलैला दुपारी साडेचारला संशयित माळी यांनी समितीचे सदस्य आमदार हेमंत पाटील यांना दीड लाखाची लाच देऊ केल्या प्रकरणी अटक झाली. आमदार पाटील यांच्यातर्फे सहा जुलैला झालेल्या तपासणीत कापडणे (ता. धुळे) येथील शालेय पोषण आहार, पाणीपुरवठा योजना आणि ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता पुढे आली. त्याची वाच्यता आमदार पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात करू नये, समितीपुढे साक्षीला बोलावू नये म्हणून माळी यांनी लाच देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ‘हायप्रोफाईल’ लाच प्रकरणामुळे नाशिक विभागीय पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले येथे दोन दिवसांपासून तळ ठोकून असून, पोलिस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या उपस्थितीत जाबजबाबाचे काम सुरू आहे. 

राज्य सरकारचीही सूचना
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सचिवालयानेदेखील पैसे संकलनाचा प्रकार गांभीर्याने घेत दिलेल्या सूचनेप्रमाणे समितीसाठी नेमलेल्या सर्व संपर्क अधिकाऱ्यांचे जाबजबाब घेण्यास सुरवात केली आहे. यात २५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी ‘एसीबी’ने तयार केली असून, त्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह निरनिराळ्या खात्यांचे विभागप्रमुख, कनिष्ठ अधिकाऱ्यांचे दिवस-रात्र फेरजाबजबाब अजूनही घेतले जात आहेत.

Web Title: Dhule news officer ACB