मोटारसायकल अपघातात पंचायत समिती सदस्य-शिक्षक ठार

मोटारसायकल अपघातात पंचायत समिती सदस्य-शिक्षक ठार
मोटारसायकल अपघातात पंचायत समिती सदस्य-शिक्षक ठार

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील छडवेल-कोर्डे (ता. साक्री) येथील नूतन मराठा विद्यालयातील शिक्षक व साक्री पंचायत समितीचे विद्यमान सदस्य पांडुरंग हनुमंत पवार (वय 46) हे गुरुवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने (एम.एच.18, एक्स-9289) साक्रीहून छडवेलकडे जात असताना वाजदरे घाटाजवळ टिटाणे गावशिवारात नंदुरबारहून साक्रीकडे जाणाऱ्या इंडिका कारचालकाने (जीजे-05/2503) त्यांच्या मोटारसायकलीस समोरून जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापती होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांच्या मदतीने त्यांचा मृतदेह साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर, तेथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साक्री पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो निजामपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मयत शिक्षकाचे नातेवाईक दिनेश सुपडू बोरसे (रा. कासारे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालक पंकज विलास शेवाळे (वय 22 रा. दिघावे ता. साक्री) याच्याविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. कोकणी घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

मनमिळाऊ शिक्षक व पंचायत समिती सदस्य..
मयत पांडुरंग पवार हे मनमिळाऊ शिक्षक व पंचायत समिती सदस्य म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यांचे मूळ गाव कासारे (ता. साक्री) असून ते सद्या साक्री येथील रुपाईनगरमध्ये राहत होते. नुकतीच सहा महिन्यांपूर्वी त्यांची छडवेल येथे बदली झाली होती. साक्री पंचायत समितीचे ते विद्यमान सदस्यही होते. साक्री गणातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. मुलगी वैद्यकीय पदवीचे तर मुलगा शालेय शिक्षण घेत आहे. त्यांच्यावर कासारे (ता. साक्री) या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com