‘धर्मराजा’च्या पवित्र्यातील आमदाराचा होतोय ‘अभिमन्यू’!

निखिल सूर्यवंशी
बुधवार, 12 जुलै 2017

धुळे - भ्रष्टाचाराच्या संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पंचायत राज समितीच्या धुळे जिल्हा दौऱ्याला सदस्य तथा नांदेड येथील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी कलाटणी दिली. दीड लाखाची ‘प्रेमाची भेट’ देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ‘डेप्युटी सीईओ’ला ‘एसीबी’च्या ताब्यात देत स्वार्थ अन्‌ लाभाच्या या महाभारतात त्यांनी धर्मराजाप्रमाणे ‘स्वच्छ’ प्रतिमा अन्‌ ‘सत्यवादी’ भूमिकेचे दर्शन घडवले. पण, अपेक्षेपेक्षा कमी ‘बिदागी’मुळेच लाचखोरीचा ‘रिव्हर्स ट्रॅप’ लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आज मुंबईमध्ये विधानसभेतील कार्यालयात पंचायत राज समितीच्या बैठकीतही त्यावर चर्चा झाली.

धुळे - भ्रष्टाचाराच्या संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पंचायत राज समितीच्या धुळे जिल्हा दौऱ्याला सदस्य तथा नांदेड येथील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी कलाटणी दिली. दीड लाखाची ‘प्रेमाची भेट’ देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ‘डेप्युटी सीईओ’ला ‘एसीबी’च्या ताब्यात देत स्वार्थ अन्‌ लाभाच्या या महाभारतात त्यांनी धर्मराजाप्रमाणे ‘स्वच्छ’ प्रतिमा अन्‌ ‘सत्यवादी’ भूमिकेचे दर्शन घडवले. पण, अपेक्षेपेक्षा कमी ‘बिदागी’मुळेच लाचखोरीचा ‘रिव्हर्स ट्रॅप’ लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आज मुंबईमध्ये विधानसभेतील कार्यालयात पंचायत राज समितीच्या बैठकीतही त्यावर चर्चा झाली. मात्र, बैठकीतील सदस्यांचा एकूणच सूर आणि व्यक्त झालेल्या मतांचा रोख पाहता तिथे अनुपस्थित असलेल्या अन्‌ ‘धर्मराजा’ची प्रतिमा लाभलेल्या आमदार पाटील यांचा लाचेच्या ‘चक्रव्यूहा’त स्वकियांकडूनच ‘अभिमन्यू’ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबईत झालेल्या पंचायत राज समितीच्या बैठकीस धुळे जिल्ह्यात पाच ते सात जुलै दरम्यान दौऱ्यावर येऊन गेलेले १७ पैकी बहुसंख्य आमदार उपस्थित होते. आमदार हेमंत पाटील, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील मात्र अनुपस्थित होते. आमदार पाटील आणि जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अटकेतील संशयित तुषार माळी यांच्याबाबत घडलेला प्रकार दुःखद आहे, असे सांगतानाच लाचेचा प्रकार घडायला नको होता, त्यामुळे धुळे जिल्ह्यासह समितीची बदनामी झाल्याबाबत बैठकीत ‘खेद’ही व्यक्त झाला. आमदार पाटील यांच्या लाचखोर पकडून देण्याच्या कृतीबाबत तर अनेकांनी नाराजी प्रगट केली. मात्र, समितीच्या बाबतीत ‘ओपन सिक्रेट’ बनलेले असले प्रकार बंद होण्यासाठी काय झाले  पाहिजे किंवा काय करावे लागेल, याबाबत मात्र सर्वांनी सोईस्करपणे मौन धारण केल्याचे सांगितले जाते. 

‘त्या’ पाच लाखांचे रहस्य उलगडावे
दौऱ्यावेळी आमदार पाटील यांनी दीड लाखांऐवजी ‘डेप्युटी सीईओ’ माळी यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली, त्यावरून घासाघीस झाली आणि लाच प्रकरणाचे ‘महाभारत’ घडले, अशी उघड चर्चा आता होऊ लागली आहे. तसेच एका सदस्य आमदाराने दोन मोबाईल घेतले. याविषयी  समितीच्या मुंबईतील बैठकीत तीव्र चिंता व्यक्त झाली. पाच लाखांवरून होणारी चर्चा समितीच्या कानावर येणेच मुळात गंभीर आहे. यातून समितीचीही बदनामी होत आहे. तसेच लाच प्रकरणी दौऱ्यातील आमदारांवर प्रश्‍नचिन्ह लागत असून, आमदार चोरच आहेत, अशी चुकीची प्रतिमा समाजासमोर उभी राहते आहे. जे सदस्य आमदार पैसे घेत नाहीत, त्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागते, अशी ‘कैफियत’ही काही आमदारांनी मुंबईतील बैठकीत  बोलून दाखविल्याचे समजते. विशेष म्हणजे, या बैठकीत ‘सकाळ’तर्फे प्रसिद्ध होत असलेल्या प्रस्तुत वृत्तमालिकेवरही गांभीर्याने चर्चा झाली. एकूणच, ही समिती राज्यात कुठेही दौऱ्यावर गेली की पैशांच्या देवाणघेवाणीचा प्रकार घडतच नाही, असे मात्र मुंबईच्या बैठकीतील सदस्य आमदारही छातीठोकपणे सांगू शकले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह विधिमंडळालाच या समितीबाबत आचारसंहिता तयार करावी लागणार आहे.   (क्रमशः)

Web Title: dhule news panchayat samiti